West Bengal : क्रिकेटचा ‘दादा’ उतरणार राजकारणाच्या मैदानात? राज्यपालांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण!
By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 27, 2020 19:38 IST2020-12-27T19:34:45+5:302020-12-27T19:38:27+5:30
गेल्या काही दिवसांपासून गांगुली भाजपमध्ये जाण्याची चर्चा सुरू आहे. यातच गांगुली आणि जगदीप धनखड यांच्या भेटीमुळे या चर्चेला अधिक बळकटी मिळाल्याचे बोलले जात आहे.

West Bengal : क्रिकेटचा ‘दादा’ उतरणार राजकारणाच्या मैदानात? राज्यपालांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण!
कोलकाता - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीराजकारणात उतरणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आज गांगुलीने पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतली. यामुळे गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ही एक खासगी भेट असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून गांगुली भाजपमध्ये जाण्याची चर्चा सुरू आहे. यातच गांगुली आणि जगदीप धनखड यांच्या भेटीमुळे या चर्चेला अधिक बळकटी मिळाल्याचे बोलले जात आहे. आज गांगुलीने पश्चिम बंगालमध्ये निष्पक्ष निवडणुकांसंदर्भातही भाष्य केले.
पश्चिम बंगालमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपकडून सौरभ गांगूलीला राजकीय आखाड्यात उतरवले जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, गांगुलीने अद्याप यासंदर्भात कुठल्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
सौरव गांगुली होऊ शकतो भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा -
अमित शाह यांनी कोलकाता दौऱ्यावर असताना बंगालचा भूमिपुत्रच बंगालचा मुख्यमंत्री होईल, असे सूचक विधान केले होते. त्यामुळे बंगालचा भूमिपुत्र सौरभ गांगुलीच आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही दिवसांपूर्वी टीएमसीच्या बाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार वैशाली डालमिया यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे वैशाली यांचे गांगुली कुटुंबाशी चांगले संबंध आहेत. एवढेच नाही, तर टीएमसीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना बाहेरचे लोक, असे संबोधले गेले होते. यावर वैशाली यांनी आक्षेप घेतला होता.
गांगुली 'या' दिवशी करू शकतो भाजपत प्रवेश -
माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त केंद्रीय गृह मंत्री अमित शाह पश्चिम बंगाल दौरा आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यादरम्यान अनेक लोक भाजपत प्रवेश करू शकतात. बोलले जात आहे, की गांगुलीदेखील यावेळी भाजपमध्ये प्रवेश करू शकतो.