बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 21:49 IST2025-12-08T21:48:38+5:302025-12-08T21:49:24+5:30
तत्पूर्वी, कबीर यांनी १७ डिसेंबरला विधानसभेचा राजीनामा देण्याचा आणि २२ डिसेंबरला नवीन राजकीय पक्ष स्थापण करण्याचे संकेत दिले होते.

बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायूं कबीर यांनी आपल्या भूमिकेसंदर्भात मोठा यू टर्न घेतला आहे. मुर्शिदाबादमध्ये बाबरी मशिदीसारख्या मशिदीचे भूमिपूजन केल्यानंतर आपण लवकरच राजीनामा देऊ, अशी घोषणा त्यांनी केली होती. मात्र दोन दिवसांतच त्यांनी आपली भूमिका बदलली. आता त्यांनी, विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा न देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ते म्हणाले, “आता राजीनाम्याचा प्रश्नच नाही. आपल्या मतदारसंघातील लोकांनीच आपल्याला पदावर राहण्याची विनंती केली असून त्यांच्या इच्छेचा आदर म्हणून त्यांनी आपला निर्णय बदलला आहे."
कबीर यांच्यापासून अधिक अंतर ठेवण्याचा तृणमूल काँग्रेसचा निर्णय -
तत्पूर्वी, कबीर यांनी १७ डिसेंबरला विधानसभेचा राजीनामा देण्याचा आणि २२ डिसेंबरला नवीन राजकीय पक्ष स्थापण करण्याचे संकेत दिले होते. दरम्यान आता तृणमूल काँग्रेसनेही कबीर यांच्यापासून अधिक अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा कक्षातील त्यांची जागा बदलून त्यांना भाजपच्या बाकांजवळ बसवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
ट्रेजरी बेंचजवळील पहिल्या रांगेत देण्यात आली होती जागा -
पूर्वी मंत्रीपदाचा दर्जा लाभल्याने कबीर यांना ट्रेजरी बेंचजवळील पहिल्या रांगेत जागा देण्यात आली होती. २०१२ मध्ये काँग्रेसमधून टीएमसीत प्रवेश करून त्यांनी पशुसंवर्धन राज्यमंत्री म्हणून काम केले होते. मात्र २०१५ च्या पोटनिवडणुकीत पराभवानंतर त्यांना मंत्रिपद गमवावे लागले.
दरम्यान, मुर्शिदाबादच्या बेलडांगा येथे मशिदीच्या भूमीपूजनानंतर, राज्यातील राजकीय वातावरण जबरदस्त तापले आहे.