पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 06:32 IST2026-04-13T06:25:49+5:302026-04-13T06:32:22+5:30
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाबाबत (एसआयआर) दाखल याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सोमवारी सुनावणी होणार आहे.

पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाबाबत (एसआयआर) दाखल याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सोमवारी सुनावणी होणार आहे.
सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या विधानसभा जागांसाठी मतदारयाद्या अंतिम करून निवडणूक आयोगाने ९ एप्रिल रोजी त्या गोठवल्या होत्या.
प. बंगालमध्ये १२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
कोलकाता : निवडणूक आयोगाने शनिवारी पोलिस प्रशासनातील उच्चपदस्थ १२ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सीआयडी महासंचालक सोमा दास मित्रा यांची बदली करून कोलकाता पोलिस दलात सहआयुक्त (गुन्हे) पदावर त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. कार्मिक विभागाचे महासंचालक सुदीप सरकार यांच्यावर पोलिस दलात सहआयुक्त म्हणून जबाबदारी सोपवली आहे. विशेष कृती दलाच्या महासंचालिका देबस्मिता दास पोलिसांतील गुप्तचर विभागात सहआयुक्त असतील.
निवडणूक आयोगाने शनिवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल रोजी १६ जिल्ह्यांतील ३.६ कोटींहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र असतील. या आकडेवारीनुसार पहिल्या टप्प्याच्या मतदारयादीत १.८४ कोटी पुरुष, १.७५ कोटी महिला आणि ४६५ तृतीयपंथीयांचा समावेश आहे.