West bengal Assembly Election : पश्चिम बंगालमध्ये उर्वरित मतदान वेळेनुसारच; एकाच टप्प्यात घेण्याची मागणी फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 06:47 IST2021-04-17T01:14:03+5:302021-04-17T06:47:54+5:30
West bengal Assembly Election : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान माेठ्या प्रचार सभा आणि दिग्गज नेत्यांचे राेड शाे झाले. आता राज्यात काेराेनाचा झपाट्याने प्रसार हाेतांना दिसत आहे.

West bengal Assembly Election : पश्चिम बंगालमध्ये उर्वरित मतदान वेळेनुसारच; एकाच टप्प्यात घेण्याची मागणी फेटाळली
काेलकाता : काेराेनाची वाढती रुग्णसंख्या विचारात घेउन पश्चिम बंगालमध्ये एकाच टप्प्यात उर्वरित मतदान घेण्याची मागणी निवडणूक आयाेगाने फेटाळली आहे. यासंदर्भात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत आयाेगाने सर्वांची भूमिका जाणून घेतल्यानंतर निर्णय घेतला. तसेच सायंकाळी ७ वाजेनंतर काेणत्याही प्रकारे प्रचारास बंदी घातली आहे.
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान माेठ्या प्रचार सभा आणि दिग्गज नेत्यांचे राेड शाे झाले. आता राज्यात काेराेनाचा झपाट्याने प्रसार हाेतांना दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये १ ते १४ एप्रिल या कालावधीत तब्बल ४२० टक्क्यांनी काेराेनाची रुग्णसंख्या वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर काेलकाता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी सर्वपक्षीय बैठक बाेलाविली हाेती.
तृणमूल काॅंग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एकाच टप्प्यात मतदान घेण्याची आग्रही भूमिका मांडली हाेती.
काेराेना महामारी नियंत्रणात आणणे सर्वात महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत राजकारण दुय्यम आहे, असे मत तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी मांडले. भाजपने लाेकशाही आणि सुरक्षेत संतुलन साधण्याचे निवडणूक आयाेगाला सुचविले हाेते. एकाच टप्प्यात मतदान घेण्यास भाजपने विराेध केला हाेता. हीच भूमिका डाव्या पक्षांनीही घेतली. निवडणूकीचा कार्यक्रम नियाेजित वेळेनुसार झाला पाहिजे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आता त्यात बदल करण्यात अर्थ नाही, अशी भूमिका माकपचे खासदार बिकाश भट्टाचार्य यांनी मांडली. मात्र, सर्वपक्षीय बैठकीत तृणमूल काॅंग्रेस पक्ष एकटा पडला.
काय म्हटले आयाेगाने
- निवडणूक आयाेगाने वाढत्या रुग्णसंख्येची दखल घेउन सर्व उमेदवार, स्टार प्रचारक तसेच राजकीय नेत्यांना काेराेनाच्या नियमावलीचे पालन करुन आदर्श घालून दाखविण्याचे आवाहन केले.
- आयाेगाने उर्वरित टप्प्यांच्या मतदानाच्या प्रचारासाठी वेळेची बंधने आणखी कडक केली आहेत. मतदानाच्या ७२ तास आधी प्रचार संपणार असून सायंकाळी ७ वाजेनंतर काेणत्याही प्रकारे प्रचारास बंदी घालण्यात आली आहे.
- प्रचार सभा, रॅली, राेड शाे इत्यादींवर सायंकाळी ७ ते सकाळी १० वाजेपर्यंत निर्बंध घातले आहेत. पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यात मतदान हाेणार आहे. त्यापैकी ४ टप्पे पूर्ण झाले असून पाचव्या टप्प्याचे मतदान आज हाेत आहे. तर उर्वरित तीन टप्प्यांसाठी ही बंधने घालण्यात आली आहेत.