मे-जून नाही, तर फेब्रुवारीपासूनच उन्हाळा सुरू होणार! IMD ने जारी केला अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 22:05 IST2025-01-31T22:04:56+5:302025-01-31T22:05:08+5:30
Weather Update: देशातील अनेक राज्यांमध्ये यंदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

मे-जून नाही, तर फेब्रुवारीपासूनच उन्हाळा सुरू होणार! IMD ने जारी केला अलर्ट
Weather Update: गेल्या काही दिवसांपासून थंडीचा प्रभाव सातत्याने कमी होताना दिसतोय. सकाळी आणि रात्री थंडी जाणवते, तर दिवसभर उष्णतेचा पारा वाढतोय. दरम्यान, हवामान खात्याने (IMD) शुक्रवारी (31 जानेवारी, 2025) माहिती दिली की, जानेवारीमध्ये हवामान उष्ण आणि कोरडे राहिले, परंतु फेब्रुवारीमध्ये देशातील अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच, यंदा उन्हाळा लवकर येण्याची शक्यता आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, हवामान विभागाने शुक्रवारी सांगितले की, जानेवारीच्या उष्णतेनंतर फेब्रुवारीमध्ये देशातील बहुतांश भागात तापमान वाढण्याची आणि सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले, पश्चिम-मध्य आणि उत्तर-पश्चिम भारतातील काही भाग वगळता बहुतांश भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भाग वगळता बहुतांश भागात किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहील.
जानेवारीमध्ये सरासरी 4.5 मिमी पावसाची नोंद
मृत्यूंजय महापात्रा यांनी सांगितले की, भारतात जानेवारी महिन्यात सरासरी 4.5 मिमी पाऊस झाला. जानेवारीत देशाचे सरासरी तापमान 18.98 अंश सेल्सिअस होते, जे 1901 नंतरचे या महिन्यातील तिसरे सर्वोच्च तापमान होते. गेल्या वर्षी ऑक्टोबर 2024 हा देखील 1901 नंतरचा सर्वात उष्ण महिना होता.
पिकांसाठी पाऊस महत्त्वाचा
तत्पूर्वी, हवामान खात्याने असा अंदाज वर्तवला होता की, जानेवारी ते मार्च दरम्यान उत्तर भारतात पाऊस सामान्यपेक्षा कमी असेल. पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशसारखी राज्ये हिवाळ्यात (ऑक्टोबर ते डिसेंबर) आणि उन्हाळ्यात (एप्रिल ते जून) रब्बी पिके घेतात. त्यांना वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे होणारा हिवाळी पाऊस या पिकांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचा आहे.