Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 15:57 IST2025-05-10T15:55:21+5:302025-05-10T15:57:58+5:30
Weather Update : साधारणपणे, नैऋत्य मान्सून १ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो आणि ८ जुलैपर्यंत संपूर्ण देशभरात दाखल होतो.

Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
भारतीय हवामानाबाबत एक मोठी अपडेट आली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार,यावेळी मान्सून केरळच्या किनाऱ्यावर वेळेच्या पाच दिवस आधी धडकू शकतो. यावेळी २७ मे रोजी देशभरात मान्सूनच्या आगमनाची अपेक्षा आहे. साधारणपणे, दरवर्षी १ जून रोजी मान्सून केरळच्या किनाऱ्यावर पोहोचतो. आयएमडीच्या आकडेवारीनुसार, जर अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे त्याच वेळेत मान्सून केरळमध्ये दाखल झाला, तर २००९ नंतर भारतीय भूमीवर मान्सूनचे हे सर्वात लवकर झालेले आगमन असणार आहे. या आधी २००९मध्ये मान्सून २३ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता.
साधारणपणे, नैऋत्य मान्सून १ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो आणि ८ जुलैपर्यंत संपूर्ण देशभरात दाखल होतो. १७ सप्टेंबरच्या सुमारास तो वायव्य भारतातून माघार घेण्यास सुरुवात करतो आणि १५ ऑक्टोबरपर्यंत परतून जातो. आयएमडीने एप्रिलमध्ये २०२५च्या मान्सूनसाठी सामान्यपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला होता आणि भारतीय उपखंडात सामान्यपेक्षा कमी पावसाच्या परिस्थितीची शक्यता नाकारली होती.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन म्हणाले की, 'जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात भारतात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.' यावेळी मान्सूनपूर्व हालचालीही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. गेल्या एका महिन्यापासून देशाच्या मोठ्या भागात जोरदार वारे आणि पावसाळी गतिविधी सुरू आहेत. शनिवारीही राजधानी दिल्लीत पावसानंतर हवामान थंड झाले होते. गेल्या पाच दिवसांत उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा आणि पंजाबच्या वेगवेगळ्या भागात पाऊस पडला आहे. उत्तर भारतात पाऊस पडत असल्याने, उष्णतेची लाट आतापर्यंत फारशी तीव्र झालेली नाही.