"गरज पडल्यास हत्यारांचा पूर्ण क्षमतेने वापर होणार, शस्त्रपूजा हे त्याचे संकेत’’, राजनाथ सिंह यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2024 17:44 IST2024-10-12T17:43:51+5:302024-10-12T17:44:33+5:30
Rajnath Singh News: देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज दसऱ्याच्या मुहुर्तावर पश्चिम बंगालमधील सुकना लष्करी तळावर पारंपरिक पद्धतीने शस्रपूजन केले. यावेळी त्यांनी शस्त्रपूजेबाबत सूचक विधान करत गरज पडल्यास या हत्यारांचा पूर्ण क्षमतेने वापर केला जाईल, असे सांगितले.

"गरज पडल्यास हत्यारांचा पूर्ण क्षमतेने वापर होणार, शस्त्रपूजा हे त्याचे संकेत’’, राजनाथ सिंह यांचा इशारा
देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज दसऱ्याच्या मुहुर्तावर पश्चिम बंगालमधील सुकना लष्करी तळावर पारंपरिक पद्धतीने शस्रपूजन केले. यावेळी त्यांनी शस्त्रपूजेबाबत सूचक विधान करत गरज पडल्यास या हत्यारांचा पूर्ण क्षमतेने वापर केला जाईल, असे सांगितले. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कलश पूजा करून अनुष्ठानाला सुरुवात केली. त्यानंतर शस्रपूजा आणि वाहन पूजा केली. त्यांनी अत्याधुनिक लष्कर, तोफखाना आणि दूरसंचार प्रणालीसह इतर अत्याधुनिक लष्करी उपकरणांचीही पूजा केली.
या दरम्यान, उपस्थितांना संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी सीमेवर शांतता आणि स्थैर्य अबाधित ठेवण्यासाठी सशस्र दलांकडून दाखवण्यात येणारी सतर्कता आणि निभावण्यात येणाऱ्या प्रमुख भूमिकेचं कौतुक केलं. दसरा हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक आहे. तसेच जवानांमध्ये मानवतेच्या मूल्यांप्रति समान सन्मान आहे.
राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, जर आमच्या हितसंबंधांना धोका निर्माण झाला तर आम्ही मोठं पाऊस उचलण्यामध्ये मागे पुढे पाहणार नाही. गरज पडल्यास आम्ही हत्यारांचा पूर्ण क्षमतेनं वापर करू, आजची शस्त्रपूजा हे त्याचे स्पष्ट संकेत आहेत, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.