'मुले-मुली सोबत बसणे आणि गळाभेट करण्याला आमचा विरोध', केरळच्या नेत्याचे वक्तव्य चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 16:55 IST2022-08-29T16:53:39+5:302022-08-29T16:55:24+5:30
केरळच्या हिंदू एझावा समाजाचे नेते वेल्लापल्ली नतेसन यांनी शाळेत मुला-मुलींना सोबत बसण्यास विरोध दर्शवला आहे.

'मुले-मुली सोबत बसणे आणि गळाभेट करण्याला आमचा विरोध', केरळच्या नेत्याचे वक्तव्य चर्चेत
केरळमधील नेते वेल्लापल्ली नटेसन त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. 'मुली आणि मुले वर्गात एकत्र बसणे भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे,' असे वक्तव्य नटेसन यांनी केले आहे. केरळमधील डाव्या लोकशाही आघाडी (एलडीएफ) नेतृत्वाखालील सरकारच्या लैंगिक तटस्थता धोरणावर रविवारी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना नटेसन यांनी हे वक्तव्य केले.
मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या जवळचे मानले जाणारे नटेसन म्हणाले, आम्ही मुली आणि मुले वर्गात एकत्र बसण्याच्या विरोधात आहोत. आपली स्वतःची एक संस्कृती आहे, आपण अमेरिका किंवा इंग्लंडमध्ये राहत नाही. आपल्या संस्कृतीत मुले-मुली एकमेकांना मिठी मारणे किंवा एकत्र बसणे स्वीकारत नाही. ख्रिश्चन आणि मुस्लिम शैक्षणिक संस्थांमध्ये हे होताना दिसत नाही.
नायर सेवा संस्था (NSS) आणि SNDP व्यवस्थापित शैक्षणिक संस्थांमध्ये अशा गोष्टी घडत असल्याचे त्यांनी सांगितले. एनएसएस आणि एसएनडीपी या राज्यातील दोन प्रमुख हिंदू जातीय संघटना आहेत. एका वृत्तसंस्थेनुसार, नटेसन म्हणाले की, अशा वर्तनामुळे अराजकता निर्माण होते आणि हिंदू संघटनांनी व्यवस्थापित केलेल्या महाविद्यालयांमध्ये तुम्ही ते पाहू शकता. अशा संस्थांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) चांगले ग्रेड किंवा निधी मिळत नाही हे हे एक कारण आहे.
नटेसन पुढे म्हणतात की, जे तरुण विद्यार्थी 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत त्यांनी एकत्र बसू नये किंवा एकमेकांना मिठी मारू नये. ते अजूनही शिकत आहेत, प्रौढ झाल्यावर ते हवे ते करू शकतात. भारतात मुलांनी एकत्र बसून एकमेकांना मिठी मारणे योग्य नाही. हे दुर्दैवी आहे की एलडीएफ सरकार, स्वतःला धर्मनिरपेक्ष सरकार म्हणवून घेत असूनही, धार्मिक दबावापुढे झुकत आहे. यातून समाजात चुकीचा संदेश जातो, असेही ते म्हणाले.