'आमचा विश्वास कायद्यावर आहे, पण...' : जुबिन गर्ग यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, तरीही गूढ कायम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 10:57 IST2025-10-20T10:54:29+5:302025-10-20T10:57:44+5:30
जुबिन गर्ग यांचा १९ सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना समुद्रात बुडून मृत्यू झाला होता.

'आमचा विश्वास कायद्यावर आहे, पण...' : जुबिन गर्ग यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, तरीही गूढ कायम!
आपल्या आवाजाच्या जादूने आसामच्या घराघरांत पोहोचलेले प्रसिद्ध गायक आणि संगीतकार जुबिन गर्ग यांच्या अकाली निधनाला रविवारी एक महिना पूर्ण झाला आहे. जुबिन यांच्या निधनाच्या धक्क्यातून अजूनही त्यांचे चाहते बाहेर पडलेले नाहीत. रविवारी त्यांच्या कुटुंबीयांनी आणि हजारो चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. एका महिन्यानंतरही त्यांच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. जुबिन गर्ग यांच्या पत्नीने तपास यंत्रणेवर विश्वास दर्शवत, 'आम्हाला स्पष्ट तपास हवा आहे' अशी मागणी देखील केली आहे.
सिंगापूरमध्ये काय घडले होते?
जुबिन गर्ग यांचा १९ सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. स्कूबा डायव्हिंग करताना ते बुडाल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले, मात्र नंतर त्यांच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यांचा मृत्यू अपघाती होता की हा घातपात होता या विषयी अनेक शंका व्यक्त केल्या गेल्या. त्यांच्या निधनाला एक महिना पूर्ण झाल्यामुळे जुबिन यांची पत्नी गरिमा यांनी कुटुंबाची आणि संपूर्ण राज्याच्या मनातील भावना व्यक्त करताना म्हटले की, "त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणांमध्ये नेमके काय झाले, हे आम्हाला आणि आसामच्या लोकांना जाणून घ्यायचे आहे."
सात जणांना अटक
जुबिन यांच्या मृत्यू प्रकरणाची राज्य पोलिसांचे गुन्हे अन्वेषण विभाग, विशेष तपास पथक सखोल चौकशी करत आहे. या प्रकरणात आतापर्यंत जुबिन यांचे दोन सुरक्षा अधिकारी, त्यांच्या बँडचे दोन सदस्य (शेखर ज्योती गोस्वामी आणि अमृतप्रवा महंत), व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा, चुलत भाऊ संदीपान गर्ग आणि आयोजक श्याम कानू महंत अशा सात जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी बँड सदस्य १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
पत्नी आणि चाहत्यांची मागणी
जुबिन यांची पत्नी गरिमा आणि असंख्य चाहत्यांनी गुवाहाटीतील त्यांच्या अंतिम संस्कार स्थळी आणि स्टुडिओमध्ये जुबिन यांना श्रद्धांजली वाहिली. जुबिन यांच्या स्टुडिओमध्ये या निमित्ताने वैदिक विधीही पार पडले. "जुबिन यांना हा स्टुडिओ खूप प्रिय होता. आम्हाला तपासावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही अशा वेळी कायद्यावर विश्वास ठेवायचा नाही, तर कोणावर ठेवायचा?" असे स्पष्ट मत गरिमा यांनी व्यक्त केले. यावेळी चाहत्यांनी 'जोई जुबिन' आणि 'जुबिनसाठी न्याय' अशा घोषणा देत आपल्या लाडक्या कलाकाराला आदरांजली वाहिली. विशेष तपास पथकाने अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवले असले आणि घटनास्थळाची दोनदा तपासणी केली असली तरी, अद्याप अंतिम अहवाल आलेला नाही. जुबिन यांच्या मृत्यूचे गूढ लवकरात लवकर उलगडावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.