आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 06:12 IST2025-05-11T06:11:26+5:302025-05-11T06:12:27+5:30
शस्त्रसंधी झाल्याच्या घोषणेनंतर पत्रकार परिषदेतून केली पाकच्या दाव्यांची पोलखोल

आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहे. पाकिस्तानकडून पुन्हा कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला तर त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असा थेट इशारा भारतीय लष्कराने शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर पाकिस्तानला शनिवारी सायंकाळी दिला. भूदलातील कर्नल सोफिया कुरेशी, हवाई दलातील विंग कमांडर व्योमिका सिंग आणि नौदलातील कमांडर रघु आर. नायर हे पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
कमांडर रघु आर. नायर यांनी सांगितले की, जर पुन्हा हल्ला झाला तर भारत अतिशय कठोर कारवाई करेल. पाकिस्तानकडून पसरविण्यात येणाऱ्या खोट्या माहितीचा कर्नल सोफिया कुरेशी यांनी पर्दाफाश केला. त्यांनी सांगितले की, जे-एफ १७ या लढाऊ विमानांनी भारताचे एस-४०० आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे तळ उद्ध्वस्त केले अशी खोटी माहिती पसरवत आहे. पठाणकोट, जम्मू, भुज आणि सिरसा येथील हवाई तळांवर हल्ला केल्याचा दावादेखील खोटा आहे. चंदीगड आणि व्यास येथील आमच्या शस्त्रागारांवर हल्ल्याचा पाकिस्तानने दावा केला, पण ही ठिकाणेही संपूर्णपणे सुरक्षित आहेत.
गुरुद्वारावरील हल्ल्याचे आरोप भारताने फेटाळले
नानकाना साहिबा गुरुद्वारावरील ड्रोन हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानने केलेले आरोप शनिवारी भारताने फेटाळून लावले. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत पाकने हे आरोप केले होते. मात्र, पाकचे आरोप पूर्णपणे चुकीचे असल्याचे पीआयबी फॅक्ट चेक विभागाने स्पष्ट केले. भारतात जातीय द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशाने या प्रकारची सामग्री प्रसारित केली जात असल्याचे नमूद करत पाकने केलेले आणखी काही आरोप पीबीआयने फेटाळून लावले. ननकाना साहिबा हे शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांचे जन्मस्थळ असून, येथील गुरुद्वारा शिखांसाठी एक पवित्र स्थळ आहे.
'भारतीय लष्कर उत्तम मूल्यांचा आदर करते'
कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, भारताने मशिर्दीना लक्ष्य केले अशीही अफवा पाकने पसरविली. भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. त्या मूल्यांचा आमचे लष्कर आदर करते.
सहा एअरबेस उद्ध्वस्त
रावळपिंडी - नूर खान एअरबेस
चकवाल - मुरीद एअरबेस
शोरकोट - रफिकी एअरबेस
पंजाब - रहीमयार खान एअरबेस
सियालकोट - सरगोधा एअरबेस
इस्लामाबाद - चकलाला एअरबेस