नवी दिल्ली - उत्तर भारतासह देशाच्या बहुतांश भागांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, वैष्णोदेवी यात्रा मार्गावर भूस्खलनामुळे आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. जम्मू- काश्मीरमध्येही विविध दुर्घटनांतील मृतांची संख्या ४१ झाली आहे. उत्तराखंडमध्ये चामोली, रुद्रप्रयाग आणि टिहरीमध्ये ढगफुटीमुळे आलेल्या महापुरात ८ जण बेपत्ता असून, हिमाचलमध्येही भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रुद्रप्रयागमध्ये आलेल्या महापुरात अनेक वाहने व घरे गाळात दबली असून, सहा जण बेपत्ता आहेत.
मध्य प्रदेशात १५ जिल्ह्यांना इशारायेत्या दोन-तीन दिवसांत मध्य प्रदेशातील बहुतांश भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, १५ जिल्ह्यांत सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. १ सप्टेंबरपर्यंत स्थानिक प्रशासनास सज्जतेचे आदेश देण्यात आले आहेत.
वैष्णोदेवी यात्रेवरून वादवैष्णादेवी यात्रा मार्गावर भूस्खलन व नैसर्गिक आपत्तींमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३४ वर गेल्याने प्रशासन व देवस्थान मंडळात वाद निर्माण झाला आहे.वारंवार इशारे देऊनही एवढे भाविक २ या भागात काय करीत होते, असा प्रश्न मंत्र्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी वैष्णोदेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष असलेले नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याविरुद्ध आघाडी उभारली आहे.मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी दुर्घटनेत झालेल्या जीवित हानीचा दोष देवस्थान मंडळावर लावला. हवामान विभागाने गंभीर इशारे देऊनही यात्रेकरू तेथे गेलेच कसे, असा प्रश्न त्यांनी केला.
पंजाब, तेलंगणात आपत्तीराज्यात १९८८ नंतर प्रथमच महापुराची आपत्ती मोठ्या प्रमाणात असून सतलज, व्यास आणि रावी नद्यांसह इतर नद्या- नाल्यांना महापूर आला आहे. यामुळे अनेक गावे पाण्यात आहेत. दक्षिणेत तेलंगणातील कामारेड्डी आणि मेदक जिल्ह्यांत गेल्या चोवीस तासांत झालेल्या पावसाने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला असून राष्ट्रीय महामार्गाचे नुकसान झाले.
हिमाचलमध्ये बेहालहिमाचल प्रदेशात कुल्लूच्या डोभीमध्ये अचानक आलेल्या महापुरात अडकलेल्या १३० जणांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आले. रावी नदीला आलेल्या पुरामुळे चंबा जिल्ह्यातील सलूण गावातील ७ घरे नदीत सामावली. महामार्गावरील वाहतूक खोळंबली आहे.