केंद्राचा राहुल गांधींवर वॉच

By Admin | Updated: March 15, 2015 02:28 IST2015-03-15T02:28:09+5:302015-03-15T02:28:09+5:30

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारराजकीय हेरगिरी करीत असल्याचा आरोप काँग्रेसने शनिवारी केल्यानंतर राजधानीतील राजकीय वातावरण तापले.

Watch the Center's Rahul Gandhi | केंद्राचा राहुल गांधींवर वॉच

केंद्राचा राहुल गांधींवर वॉच

राजकीय हेरगिरीचा काँग्रेसचा आरोप : संसदेत मुद्दा उपस्थित करणार
नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारराजकीय हेरगिरी करीत असल्याचा आरोप काँग्रेसने शनिवारी केल्यानंतर राजधानीतील राजकीय वातावरण तापले. सरकारच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने आक्रमक निदर्शने केली, तर पंतप्रधान मोदी तसेच गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या सविस्तर स्पष्टीकरणाचा आग्रह काँग्रेसने धरला आहे.
राहुल गांधींवर पाळत आणि हेरगिरीचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्याचा इशाराही दिला आहे. दिल्ली पोलिसांनी मात्र हेरगिरीचा आरोप फेटाळला आहे. काँग्रेसच्या आरोपांचे खंडन करताना भाजपाने खा. राहुल यांच्या अनुपस्थितीच्या मुद्द्यावर बोट ठेवले आहे.
गांधी यांच्या कर्मचाऱ्यांनी दिल्ली पोलिसांतील अधिकाऱ्यास त्यांच्याबद्दल अनावश्यक आणि निरर्थक माहिती मिळविण्याच्या प्रयत्नात पकडले होते, असा काँग्रेसचा दावा आहे. त्याचवेळी हा केवळ एक सुरक्षेचा मुद्दा असल्याबाबत पोलिसांच्या दाव्याचे काँग्रेसने खंडन केले.
पक्षाचे प्रवक्ते अभिषेक मनू
सिंघवी यांनी येथे पत्रकारांना या संपूर्ण घटनाक्रमाची सविस्तर माहिती दिली. दिल्ली पोलिसांतील शमशेरसिंग नामक साहाय्यक उपनिरीक्षकाने राहुल यांचे केस, त्यांच्या डोळ्यांचा रंग, वय, उंची, ते कुठल्या प्रकारचे बूट घालतात, त्यांच्या वडिलांचे नाव काय आणि त्यांनी कोणकोणत्या ठिकाणचा
दौरा केला आहे, यासंदर्भात चौकशी
केली होती. एवढेच नाहीतर त्यांच्या सहकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि पत्तेही त्याने मागितले होते. काँग्रेस उपाध्यक्षांच्या निवासस्थानी बंदोबस्तात तैनात विशेष सुरक्षा गटाच्या (एसपीजी) जवानांनी
त्याला रोखले आणि टोकलेही होते, असे त्यांनी सांगितले.
सिंघवी यांनी हा एक गंभीर राष्ट्रीय मुद्दा असल्याचे सांगून याची तुलना गुजरातच्या कथित फोन टॅपिंगच्या घटनेशी केली. सर्व पक्षांनी एकजुटीने या विरोधात आवाज बुलंद करण्याचे आवाहनही केले.

हे गुजरात मॉडेल
हे हेरगिरीचे गुजरात मॉडेल असल्याचा आरोप सिंघवी यांनी केला. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना एका महिलेच्या कथित हेरगिरी प्रकरणाचा अप्रत्यक्ष उल्लेख करताना तसेच पंतप्रधानांचा नामोल्लेख न करता आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांची हेरगिरी आणि त्यांच्यावर पाळत ठेवण्याचे हे गुजरात मॉडेल असू शकते भारतीय मॉडेल नाही, असा हल्लाबोलच त्यांनी केला.

राहुल गांधी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरूहोण्यापूर्वीच चिंतन रजेवर गेले आहेत. काँग्रेस नेत्यांनाही त्यांच्या ठावठिकाण्याबाबत काही कल्पना नाही. राजकीय वर्तुळातही त्यांचा हा अज्ञातवास उत्सुकतेचा विषय झाला आहे.

हेरगिरीचीही चौकशी
खा. राहुल यांच्या चौकशीसाठी गेलेल्या कथित पोलिसांबाबत माहिती घेण्याकरिता दिल्ली पोलिसांचे एक पथक शनिवारी कामाला लागले. अतिरिक्त पोलीस उपायुक्त (नवी दिल्ली) जतीन नरवाल यांच्या नेतृत्वातील या पथकाने गांधींच्या तुघलक मार्गस्थित निवासस्थानी जाऊन संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. हे पथक चौकशीअंती पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांना अहवाल सादर करेल.

भाजपाचा प्रतिहल्ला
मोदी सरकारवर हेरगिरीचा आरोप करणाऱ्या काँग्रेसवर भाजपाने प्रतिहल्ला चढवला. नियमित प्रक्रियांमध्ये कटकारस्थान शोधण्याची या पक्षाला सवय असून हा पक्ष कायद्यापेक्षा स्वत:ला श्रेष्ठ मानतो, असा आरोप भाजपाने केला. राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीबद्दलही या पक्षाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या सततच्या गैरहजेरीमुळे काँग्रेस एवढी त्रस्त झाली आहे की, यामुळे पक्षातील नेत्यांचे मानसिक संतुलनच बिघडले आहे, अशी टीका भाजपाने केली.

Web Title: Watch the Center's Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.