Wasim Rizvi: “माझं पार्थिव दफन करू नका, हिंदू पद्धतीने अग्नी देऊन अंत्यसंस्कार करा”; वसीम रिझवींचे मृत्यूपत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 20:42 IST2021-11-15T20:41:23+5:302021-11-15T20:42:12+5:30
उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे सदस्य आणि माजी अध्यक्ष वसीम रिझवी (Wasim Rizvi) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Wasim Rizvi: “माझं पार्थिव दफन करू नका, हिंदू पद्धतीने अग्नी देऊन अंत्यसंस्कार करा”; वसीम रिझवींचे मृत्यूपत्र
नवी दिल्ली: उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे सदस्य आणि माजी अध्यक्ष वसीम रिझवी (Wasim Rizvi) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी वसीम रिझवी यांचे मृत्यूपत्र समोर आले असून, यामध्ये रिझवी यांनी मृत्यूनंतर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करावेत, असे म्हटले आहे. तसेच अग्नी देण्याचा अधिकार कोणाला असावा, याबाबतही रिझवी यांनी आपल्या मृत्यूपत्रात लिहून ठेवले असल्याचे सांगितले जात आहे.
वसीम रिझवी यांनी आपला मृत्यू झाल्यानंतर आपल्याला दफनभूमीमध्ये दफन न करता स्मशानामध्ये अग्नी देऊन पार्थिवावर अंत्यसंस्कार करावेत. आपल्या पार्थिवाला अग्नी देण्याचे अधिकार महंत नरसिम्हा नंद सरस्वती यांना देत आहे, असे रिझवी यांनी आपल्या मृत्यूपत्रात म्हटले आहे. तसेच यासंदर्भातील एक व्हिडिओही त्यांनी जारी केला आहे.
कट्टरपंथी मला मारण्याचा कट रचत आहेत
वसीम रिझवी यांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, कुराणमधील २६ आयते हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. माझा गुन्हा हा आहे की, पैगंबर-ए-एस्लाम हजरत मोहम्मद यांच्यावर एक पुस्तक लिहिले. त्यामुळेच कट्टरपंथी मला मारण्याचा कट रचत आहेत. माझ्या पार्थिवाला दफनभूमीमध्ये जागा दिली जाणार नाही, असेही या कट्टरपंथींकडून सांगितले जात आहे, असे सांगत त्यामुळेच मृत्यूनंतर देशामध्ये शांतता कायम रहावी, यासाठी मृत्यूपत्र लिहून प्रशासनाला पाठवत आहे. माझ्या मरणानंतर माझ्या पार्थिवावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले जावेत, असे वसीम रिझवी यांनी म्हटले आहे.
माझ्या चितेला नरसिम्हा नंद सरस्वती यांनी द्यावा
माझ्या मृत्यूनंतर शांतता कायम रहावी, म्हणून मृत्यूपत्र लिहिले असून, मृत्यूनंतर माझे पार्थिव लखनऊमधील माझ्या हिंदू मित्रांच्या स्वाधीन करावे आणि त्यानंतर चिता रचून त्यावर अंत्यसंस्कार करावेत. माझ्या चितेला नरसिम्हा नंद सरस्वती यांनी द्यावा, असेही रिझवी यांनी म्हटले आहे. दरम्यान, रिझवी यांचे वादग्रस्त पुस्तक समोर आल्यापासून मुस्लीम समाजाकडून जोरदार विरोध केला जात आहे.