युद्धामुळे कोरोनासारखे संकट; सतर्क राहा, बिकट स्थिती दीर्घकाळ टिकण्याची शक्यता: PM मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 06:02 IST2026-03-24T06:01:25+5:302026-03-24T06:02:52+5:30
या संकटाचा देशाच्या अंतर्गत सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

युद्धामुळे कोरोनासारखे संकट; सतर्क राहा, बिकट स्थिती दीर्घकाळ टिकण्याची शक्यता: PM मोदी
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेली बिकट स्थिती दीर्घकाळ टिकण्याची शक्यता आहे. कोरोना काळात देशातील जनतेने जशी एकजूट दाखविली तशीच तयारी यावेळीही ठेवावी. कोरोनाप्रमाणेच या संकटावरही मात करू असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले. देशात पुरेसा इंधनसाठा असल्याचेही ते म्हणाले.
इराण युद्धाबाबत मोदी म्हणाले, पश्चिम आशियातील संकटावर चर्चा आणि राजनैतिक मार्गाने तोडगा काढावा असा भारताने कायम आग्रह धरला आहे. व्यापारी जहाजांवरील हल्ले, होर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळे भारताला अमान्य आहेत.
३ लाख ७५ हजार भारतीय मायदेशी सुखरूप परतले
मोदी म्हणाले, भारत २७ ऐवजी ४१ देशांकडून इंधन आयात करत आहे. युद्ध सुरू झाल्यापासून ३ लाख ७५ हजारांहून अधिक भारतीय सुरक्षित मायदेशी परतले आहेत. त्यात ७००हून अधिक वैद्यकीय विद्यार्थी आहेत.
पंतप्रधानांनी या मुद्द्यांकडे वेधले लक्ष
तेल आणि वायू : सध्या ६.५ दशलक्ष मेट्रिक टन साठा क्षमता निर्माण करण्याचे काम सुरू. भारत सरकार विविध देशांमधील पुरवठादारांच्या संपर्कात.
अन्न आणि रेशन पुरवठा : अन्नधान्याचा पुरेसा साठा. आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी पुरेशा व्यवस्था. शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी अनेक उपाययोजना.
वीज पुरवठा : देशातील वीज निर्मिती केंद्रांवर कोळशाचा साठा उपलब्ध. वीज निर्मितीपासून ते वितरणापर्यंत प्रणालीच्या प्रत्येक पैलूवर सातत्याने देखरेख.
ऊर्जा : ऊर्जा हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या संघर्षाचा भारतावर होणारा प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी धोरणात्मक पातळीवर काम. त्यासाठी एक विशेष गट स्थापन.
राजनैतिक संवाद : व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले किंवा त्यांना होणारा अडथळा पूर्णपणे अस्वीकार्य. शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी भारत त्यांना प्रोत्साहित करत आहे.
या संकटाचा देशाच्या अंतर्गत सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान