"पंतप्रधान व्हायचंय, म्हणूनच...", ममता बॅनर्जींच्या आरोपावर भाजपचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 20:16 IST2024-07-27T19:49:58+5:302024-07-27T20:16:19+5:30
भाजप खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल करत म्हटलं की, ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान व्हायचं आहे, म्हणूनच त्या असं नाटक करत आहेत.

"पंतप्रधान व्हायचंय, म्हणूनच...", ममता बॅनर्जींच्या आरोपावर भाजपचा पलटवार
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राजधानी दिल्लीत आज नीती आयोगाच्या नवव्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक झाली. या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही हजेरी लावली. मात्र, ममता बॅनर्जी या नीती आयोगाची बैठक अर्धवट सोडून बाहेर पडल्या. बाहेर आल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
माझा माईक बंद केला, मला बोलू दिलं नाही, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर भेदभावाचा आरोप केला. यावर भाजपनं प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल करत म्हटलं की, ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान व्हायचं आहे, म्हणूनच त्या असं नाटक करत आहेत.
भाजप नेत्या लॉकेट चॅटर्जी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, "ममता बॅनर्जी खोटं बोलत आहेत. पीआयबी फॅक्ट चेकनं याची पुष्टी केली आहे. त्यांना पंतप्रधान व्हायचं आहे, एक मोठ्या नेत्या बनायचं आहे. त्यामुळं त्या नाटक करत आहेत. टीएमसीचं राजकारण नाटकानं भरलेलं आहे. ममता दीदींना पश्चिम बंगालचं काही भले करण्याची इच्छा नाही, म्हणूनच त्या बैठकीपूर्वी निघून आल्या."
दुसरीकडे, भाजप नेत्या व केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनीही ममता बॅनर्जींना प्रत्युत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या की, "नीती आयोगाच्या बैठकीत ममता बॅनर्जी सहभागी झाल्या होत्या. आम्ही सर्वांनी त्या काय बोलतात ऐकलं. प्रत्येक मुख्यमंत्र्यांना प्रत्येक टेबलवर बसवलेल्या स्क्रीनवर दिसणारा वेळ देण्यात आला होता. त्यांचा माईक बंद झाल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं. हे पूर्णपणे खोटं आहे. सर्व मुख्यमंत्र्यांना बोलण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला. असं असतानाही ममता बॅनर्जींचा दावा दुर्दैवी आहे. त्यांनी खोट्या गोष्टींवर नॅरेटीव्ह तयार करण्याऐवजी खरं बोलावं".
ममता बॅनर्जींच्या आरोपांबाबत पीआयबीचा दावा
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी केलेल्या आरोपांबाबत दुसरी बाजू समोर आणत पीआयबीनेही दावा केला आहे. सोशल मीडिया साईट एक्सवर पीआयबी फॅक्ट चेकने यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यात लिहिलं आहे की, नीती आयोगाच्या बैठकीमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा माईक बंद करण्यात आल्याचा करण्यात आलेला आरोप चुकीचा आहे.
बैठक अर्धवट सोडून आल्यावर काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
नीती आयोगाच्या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर ममता बॅनर्जी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, 'केंद्र सरकारनं राज्य सरकारांशी भेदभाव करू नये. मला बोलायचं होतं, पण मला फक्त ५ मिनिटं बोलू दिलं. माझ्या आधीचे लोक १० ते २० मिनिटं बोलले. या बैठकीत विरोधी पक्षातील मी एकटीच होते, पण तरीही मला बोलू दिलं गेलं नाही. हे अपमानास्पद आहे." पुढे त्या म्हणाल्या, "मी बोलत होते, तेवढ्यात माझा माईक बंद करण्यात आला. मी म्हणाले, तुम्ही मला का थांबवलं, तुम्ही भेदभाव का करताय? मी बैठकीत सहभागी होत आहे, तुम्ही खुश व्हायला पाहिजे, त्याऐवजी तुम्ही तुमची पार्टी, तुमच्या सरकारला अधिक वाव देत आहात आणि तुम्ही मला बोलण्यापासून रोखत आहात, हा केवळ बंगालचाच नाही तर सर्व प्रादेशिक पक्षांचाही अपमान आहे." दरम्यान, केंद्र सरकारनं म्हटलं आहे की, ममता बॅनर्जी यांचा माईक बंद झाला नव्हता, त्यांची बोलण्याची वेळ संपली होती.