Nitin Gadkari: पोस्ट, बँकांमधील एफडीपेक्षा दोन, तीन टक्के जास्त व्याज देण्याची इच्छा; नितीन गडकरींचा मेगा प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 18:43 IST2021-12-18T18:42:01+5:302021-12-18T18:43:12+5:30
Nitin Gadkari's Investment Plan to small investors: सामान्यपणे रिटायर्ड सरकारी अधिकारी आपली सेव्हिंग्ज बँकांमध्ये ठेवतात आणि त्यावर व्याज घेतात. हे व्याज आता कमी होऊ लागले आहे. यामुळे देशातील वरिष्ठ नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.

Nitin Gadkari: पोस्ट, बँकांमधील एफडीपेक्षा दोन, तीन टक्के जास्त व्याज देण्याची इच्छा; नितीन गडकरींचा मेगा प्लॅन
केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या सुपिक कल्पनेतून मेगा प्लॅन आणला आहे. यामध्ये सेवानिवृत्त, वयोवृद्धांना बँक-पोस्टात ठेवलेल्या एफडीवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा दोन ते तीन टक्के जास्त व्याज देण्याचा विचार ते करत आहेत. यासाठी त्यांनी इनविट मॉडेलला छोट्या गुंतवणूकदारांच्या दृष्टीने उपयुक्त बनविण्यासाठी चर्चा सुरु केली आहे.
गडकरींचे मंत्रालय सेबीशी यावर चर्चा करत असून लवकरच काहीतरी ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याचे संकेत खुद्द गडकरींनीच दिले आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि पावर ग्रिड कार्पोरेशन यांनी सार्वजनिक क्षेत्रासाठी इन्फ्रास्ट्रक्चर गुंतवणूक ट्रस्ट (इनविट) चा प्रस्ताव दिला आहे.
केंद्रीय मंत्री गडकरींनी म्हटले की, यामुळे गुंतवणूकदारांना बँकेच्या तुलनेत दोन-तीन टक्के जास्त व्याज दर मिळेल. मी माझ्या अधिकाऱ्यांशी यावर चर्चा करत आहे. सेबीच्या परवानगीचे देखील प्रयत्न सुरु आहेत. जर सेबीची परवानगी मिळाली तर छोट्या गुंतवणूकदारांकडून इनविटमध्ये गुंतवणूक होईल. आम्हाला बँकांना नुकसान पोहोचवायचे नाहीय, परंतू यात गुंतवणूकदारांचा फायदा होणार आहे. गुंतवणूकदारांना हवी असेल तर ते दर महिन्याला व्याजाची रक्कम काढू देखील शकतात.
सामान्यपणे रिटायर्ड सरकारी अधिकारी आपली सेव्हिंग्ज बँकांमध्ये ठेवतात आणि त्यावर व्याज घेतात. हे व्याज आता कमी होऊ लागले आहे. यामुळे देशातील वरिष्ठ नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. जर त्यांनी हे पैसे इनविटमध्ये गुंतविले तर त्यांचा पैसा देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी वापरला जाईल आणि चांगला रिटर्नही मिळेल, असेही गडकरी यांनी सांगितले.
ईपीएफओ सध्या 5 टक्के रक्कम या इनविटमध्ये गुंतवणार आहे. ईपीएफओच्या बोर्डाने यासाठी परवानगी दिली आहे. इनविट हे म्युच्युअल फंडासारखे आहे. मात्र, यात जोखिमदेखील आहे.