मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 18:56 IST2025-11-05T18:55:00+5:302025-11-05T18:56:37+5:30
Rahul Gandhi Vote Chori Prashant Kishor: विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन मतचोरीचा दावा करत आणखी एक बॉम्ब फोडला. राहुल गांधींनी हरयाणा विधानसभा निवडणुकीबद्दल केलेल्या दाव्यावर बोलताना प्रशांत किशोर यांनी सल्ला दिला.

मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
गेल्या हरयाणा विधानसभा निवडणूक झाली. निवडणुकीच्या निकालापर्यंत सत्तांतर होईल, अशा अंदाज मांडले जात होते. पण, निकाल धक्का देणारे लागले. याच निवडणुकीत मतचोरी झाल्याचा दावा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. त्यांनी बिहारमध्येही हे घडेल अशी भीती व्यक्त केली. राहुल गांधी यांच्या भूमिकेवर जन सुराज्य पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांनी भूमिका मांडली.
राहुल गांधी यांच्या मत चोरीच्या मुद्द्यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, "राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्याकडे ताकद आहे. त्यांनी लढले पाहिजे. विरोधी पक्षाच्या लोकांना हे सांगितले पाहिजे. त्यांनी निवडणूक आयोगाला घेरले पाहिजे आणि कायदेशीर पावले उचलली पाहिजेत."
"राहुल गांधी विरोधी पक्षनेता म्हणून जे प्रश्न निवडणूक प्रक्रियेबद्दल उपस्थित करत आहेत, त्याची उत्तरे निवडणूक आयोगाने द्यायला हवी", अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
बिहारमध्ये मतचोरी हा मुद्दा नाहीये. इथे स्थलांतर, भ्रष्टाचार आणि शिक्षण हे निवडणुकीचे मुद्दे आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हरयाणात 25 लाख बोगस मते
विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत दावा केला की, हरयाणामध्ये पाच श्रेणींमध्ये एकूण 25 लाख बनावट मते पडली, म्हणजेच दर आठपैकी एक मतदार बोगस होता. 5,21,000 पेक्षा जास्त बोगस मतदार आढळून आले. याचपद्धतीने राज्यात एकूण 2 कोटी मतदारांमध्ये 25 लाख मतांची चोरी झाली आहे.
एका महिलेचे मतदार म्हणून 223 वेळा नाव
राहुल गांधींनी एक धक्कादायक दावा केला. एका बूथवर एकाच महिलेला 223 वेळा मतदार यादीत दाखवले गेले आहे. त्या महिलेने खरोखर किती वेळा मतदान केले? निवडणूक आयोगाने याचे उत्तर द्यायला हवे. सीसीटीव्ही फुटेज जाणीवपूर्वक डिलीट करण्यात आले, जेणेकरून खरी माहिती समोर येऊ नये. ही संपूर्ण मत चोरी भाजपला फायदा मिळवून देण्यासाठी करण्यात आली होती, असा आरोप त्यांनी केला.