विश्व हिंदू परीषदेने घातली लव्ह जिहादची घर वापसीशी सांगड
By Admin | Updated: January 8, 2015 13:28 IST2015-01-08T13:28:26+5:302015-01-08T13:28:26+5:30
करीना कपूरचं मॉर्फ केलेलं छायाचित्र मुखपृष्ठावर छापून घरवापसीच्या मोहिमेमध्ये लव्ह जिदाहचाही अंतर्भाव करायला हवा असा वादग्रस्त पवित्रा विश्व हिंदू परिषदेच्या मासिकाने घेतला आहे.

विश्व हिंदू परीषदेने घातली लव्ह जिहादची घर वापसीशी सांगड
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - करीना कपूरचं मॉर्फ केलेलं छायाचित्र मुखपृष्ठावर छापून घरवापसीच्या मोहिमेमध्ये लव्ह जिदाहचाही अंतर्भाव करायला हवा असा वादग्रस्त पवित्रा विश्व हिंदू परिषदेच्या मासिकाने घेतला आहे. दुर्गा वाहिनी या विश्व हिंदू परिषदेच्या महिला विभागाच्या मुखपत्रामध्ये धर्मांतरण ते राष्ट्रांतरण अशा शीर्षकाखाली हा मुद्दा छेडण्यात आला आहे. करीना कपूरचा अर्धा चेहरा नकाबने झाकून मुखपृष्ठावर दाखवण्यात आला आहे.
दोन वर्षांपूर्वी करीना कपूरने सैफ अली खानशी लग्न केले आहे. दुर्गा वाहिनीच्या उत्तर भारतातल्या समन्वयक रजनी ठुकराल यांनी सांगितले की सेलिब्रिटींचे सर्वसामान्य अनुकरण करतात. सेलिब्रिटी असं करू शकतात तर आपण का नाही असा विचार तरूण करत असल्यामुळे मुखपृष्ठासाठी करीनाच्या छायाचित्राचा वापर केल्याचे ठुकराल म्हणाल्या. आत्तापर्यंत मुस्लीम पुरूषांशी लग्न केलेल्या १६ महिलांनी घरवापसी करण्याची इच्छा आमच्याकडे व्यक्त केल्याचे व त्यातल्या दोघींनी पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केल्याचेही ठुकराल यांनी सांगितले. मूळ धर्मात ज्यांची परतायची इच्छा आहे, त्यांनी पुन्हा प्रवेश करणे याला सेक्युलर लोक धर्मांतरण कसे काय म्हणतात अशी खिल्लीही ठुकराल यांनी संपादकीयात उडवली आहे.
लव्ह जिहाद व घरवापसी या मुद्यांवरून देशभरात वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यसभेचे तर कामकाज या मुद्यांवर पंतप्रधानांनी भाष्य करावे या मागणीसाठी बंद पाडण्यात आले होते. दरम्यान, दुर्गावाहिनीने केलेला प्रकार नवीन नसला तरी हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया सैफ अली खानने व्यक्त केली आहे.