‘भारत बंद’ला हिंसक वळण, ‘अ‍ॅट्रॉसिटी’संबंधीच्या निर्णयाविरोधात संघटना रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 05:45 AM2018-04-03T05:45:23+5:302018-04-03T05:45:23+5:30

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर हा कायदा सौम्य झाल्याचे सांगत, देशभरातील अनेक दलित संघटना सोमवारी रस्त्यावर उतरल्या. त्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले.

 The violent turn of 'Bharat Bandh', on the organization road against the decision about 'Atrocity' | ‘भारत बंद’ला हिंसक वळण, ‘अ‍ॅट्रॉसिटी’संबंधीच्या निर्णयाविरोधात संघटना रस्त्यावर

‘भारत बंद’ला हिंसक वळण, ‘अ‍ॅट्रॉसिटी’संबंधीच्या निर्णयाविरोधात संघटना रस्त्यावर

googlenewsNext

नवी दिल्ली / भोपाळ : अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर हा कायदा सौम्य झाल्याचे सांगत, देशभरातील अनेक दलित संघटना सोमवारी रस्त्यावर उतरल्या. त्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. आंदोलकांनी अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक केली. काही ठिकाणी पोलिसांना गोळीबारही करावा लागला. या हिंसाचारात ९ जण ठार झाले. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि पंजाबनंतर महाराष्ट्रातही काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.
गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशी सरकार सहमत नाही. या निर्णयाचा व्यापक आढावा घेण्यासाठी सरकारने याचिका दाखल केलेली आहे.
केंद्र सरकारने त्वरित याचिका दाखल केल्याबद्दल केंद्रीय मंत्री आणि दलित नेते रामविलास पासवान यांनी कौतुक केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना स्पष्ट केले आहे की, लोकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते पावले उचलण्यात यावीत. तथापि, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात दंगाविरोधी पथकाच्या ८०० पोलिसांना पाठविण्यात आले आहे.
देशाच्या अनेक भागांत परिवहन सेवा विस्कळीत झाली. काही राज्यांनी आज शिक्षण संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. इंटरनेट आणि मोबाइल सेवाही काही भागात बंद ठेवण्यात आली होती.

काय आहे प्रकरण?

सर्वोच्च न्यायालयाने २० मार्च रोजी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (अ‍ॅट्रॉसिटी कायदा) तरतुदीत सौम्यता आणली आहे.
तक्रारीचा खरेपणा तपासल्याखेरीज, यापुढे कोणावरही गुन्हा नोंदविता येणार नाही. प्राथमिक चौकशीनंतर गुन्हा नोंदविला, तरी सक्षम प्राधिकाऱ्याच्या लेखी संमतीशिवाय आरोपीस अटक करता येणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. याच निर्णयाला दलित संघटना आणि विरोधी पक्षांनी विरोध दर्शविला आहे.

१०० पेक्षा जास्त रेल्वेंवर परिणाम
आंदोलकांनी रेल्वेमार्ग रोखल्यामुळे सोमवारी १०० पेक्षा जास्त प्रवासी आणि मेल रेल्वे सेवेवर परिणाम झाला, परंतु रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. एक किंवा दोन ठिकाणांहून दगडफेकीच्या घटनांचे वृत्त आहे, परंतु कोणी प्रवासी किंवा रेल्वे कर्मचारी जखमी झालेला नाही, असे उत्तर रेल्वेचे प्रवक्ते नितीन चौधरी म्हणाले.

मध्य प्रदेश : काही भागांत संचारबंदी लागू करण्यात आली असून, भिंदमध्ये सैन्याला पाचारण करण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील पोलीस महासंचालकांनी सांगितले की, आक्रमक आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात ग्वाल्हेरमध्ये दोन, भिंदमध्ये दोन आणि मोरेना येथे एकाचा मृत्यू झाला.
उत्तर प्रदेश : बंद काळात हिंसक निदर्शनांत एक जण ठार तर ४० पोलिसांसह जवळपास ७५ जण जखमी झाले. जाळपोळ, सार्वजनिक मालकीच्या मालमत्तेचे नुकसान करण्यासह अनेक कारणांसाठी अनेक जिल्ह्यांत ४४८ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. बंदच्या कालावधीत मुजफ्फरनगर, हापूर, मेरठ, आग्रामध्ये हिंसाचार उसळला होता. याच भागांना त्याचा सर्वाधिक फटका बसला. आझमगडसह काही जिल्ह्यात हिंसाचार झाल्याचे वृत्त असून, आंदोलकांनी दोन बसला आग लावली.
राजस्थान : अलवर येथे एक जणाचा मृत्यू झाला. येथे ९ पोलिसांसह २६ जखमी झाले आहेत. राजस्थानात अजमेरमध्ये २० आणि जयपूरमध्ये १० आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दिल्ली : अनेक ठिकाणी आंदोलक ‘जय भीम’च्या घोषणा देत रस्त्यावर उतरले होते.
पंजाब : सैन्य आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. सीबीएसईने पंजाबमधील १२ वी आणि १०ची आजची परीक्षा स्थगित केली आहे.

नागपूर, खान्देशात हिंसक पडसाद : नागपुरातील इंदोरा, जरीपटका परिसरात आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळले. बसच्या काचा फोडून सीटला आग लावली. गड्डीगोदाम येथे दिल्ली रेल्वे लाइनवर तामिळनाडू एक्स्प्रेस रोखून धरली. जळगाव जिल्ह्यात दगडफेकीत तीन जण जखमी झाले, तर शहादा (जि. नंदुरबार) येथे आंदोलकांनी पाच बसवर दगडफेक केली.

Web Title:  The violent turn of 'Bharat Bandh', on the organization road against the decision about 'Atrocity'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.