हिंसा घडवणं पूर्वनियोजित कट, यात राजकीय पक्षाचे लोक सामील; शेतकरी नेते टिकैत यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 04:04 PM2021-01-26T16:04:40+5:302021-01-26T16:13:19+5:30

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलनात काही राजकीय पक्षाचे लोक सामील झाले असून त्यांनी हिंसा घडवल्याचा आरोप केला आहे.

violence is a premeditated conspiracy involving people from political parties Allegation by farmer leader rakesh tikait | हिंसा घडवणं पूर्वनियोजित कट, यात राजकीय पक्षाचे लोक सामील; शेतकरी नेते टिकैत यांचा आरोप

हिंसा घडवणं पूर्वनियोजित कट, यात राजकीय पक्षाचे लोक सामील; शेतकरी नेते टिकैत यांचा आरोप

Next

नव्या कृषी कायद्यांच्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये ठिकठिकाणी पोलीस आणि शेतकरी आंदोलकांमध्ये झटापट झाली आहे. रॅलीचा मार्गसोडून काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर कब्जा केला, तर काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना झाल्या आहेत. पण यावरुन आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. 

भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलनात काही राजकीय पक्षाचे लोक सामील झाले असून त्यांनी हिंसा घडवल्याचा आरोप केला आहे. "पोलीस आम्हाला संपूर्ण सहकार्य करत होते आणि आहेत. पण काही आंदोलकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे आणि ते निर्माण करण्याचा पूर्वनियोजित कट केला गेला होता", असा आरोप टिकैत यांनी केला आहे. 

Video : हिंसक शेतकऱ्यांच्या जमावातून 'त्या' वृद्धाने पोलिसाला सुखरूप काढले बाहेर

स्वराज इंडिया पक्षाचे संस्थापक योगेंद्र यादव यांनीही दिल्लीत तीन-चार ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्याचं म्हटलं आहे. पण संपूर्ण माहिती माझ्याकडे आलेली नाही. माध्यमांमध्ये हिंसाचार झाल्याचं दाखवलं जात आहे. त्याचीच माहिती माझ्याकडे आलेली आहे. रॅलीत सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या नियोजित मार्गानेच शांततेनं मार्च काढावा, असं आवाहन योगेंद्र यादव यांनी केलं आहे. यासोबतच जे लोक आमच्या संघटनेचा भाग नाहीत. त्याच लोकांकडून हा हिंसाचार घडवला गेल्याची शक्यता आहे, असंही यादव म्हणाले. 

किसान एकता मार्चने ट्विट करुन हिंसा निर्माण करणं हा सरकारचा पूर्वनियोजित कट असल्याचा दावा केला आहे. शेतकरी नेत्यांनी दावा केला आहे की, "मोर्चाचा जो मार्ग होता, त्याबाबतची माहिती सर्वांपर्यंत पोहचली नसावी, काही शेतकऱ्यांमध्ये मोर्चाच्या मार्गाबाबत थोडा गोंधळ निर्माण झाला होता. परंतु त्या ठिकाणी झालेल्या हिंसेमागं सरकारचं मोठं राजकारण आहे"

लाल किल्ल्यावर आंदोलक शेतकऱ्यांचा कब्जा, फडकवला झेंडा

दरम्यान, दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. तोडफोड आणि हिंसेतून मार्ग निघू शकत नाही. सर्वांना शांतता राखण्याचं मी आवाहन करतो आणि आजच्या दिवशी अशा अराजक घटनांसाठी नाही, असं ट्विट भाजप खासदार गौतम गंभीर यानं केलं आहे. तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही ट्विट करत आंदोलक शेतकऱ्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. 

Video : शेतकऱ्यांचा संघर्ष पेटला! शेतकरी आंदोलकाकडून पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न   

"शेतकरी आंदोलन आतापर्यंत शांततेच्या मार्गानेच झालं आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी शांतता राखावी असं मी आवाहन करतो. लोकशाहीमध्ये हिंसाचाराला स्थान नाही. शेतकरी आंदोलनात हिंसाचार झाला तर यातून शेतकरी आंदोलनाला अयशस्वी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींचा विजय होईल. त्यामुळे सर्वांनी शांतता राखावी", असं ट्विट गेहलोत यांनी केलं आहे. 

Web Title: violence is a premeditated conspiracy involving people from political parties Allegation by farmer leader rakesh tikait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.