गुजरातमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हिंसाचार, सहा ठार दोन गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 16:30 IST2018-10-24T16:30:19+5:302018-10-24T16:30:58+5:30
गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत वाद होऊन 6 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

गुजरातमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हिंसाचार, सहा ठार दोन गंभीर
अहमदाबाद - गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत वाद होऊन 6 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कच्छ पश्चिमचे पोलीस अधीक्षक एम.एस.भारदा यांनी याबाबत माहिती दिली. येथील छसरा गावात काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. त्यावरुन, मंगळवारी दोन गटात मोठा वाद झाला. त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत.
छसरा गावातील ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीत महिला उमेदवार सरपंचपदी निवडणून आल्या. त्यामुळे, पराभूत झालेल्या गटाचा विजयी गटासोबत वाद उफाळून आला. मात्र, हा शाब्दिक वादाला क्षणातचं हिंसात्मक वळण लागले. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये धारदार शस्त्रांनी हाणामारी झाली. त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत. या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच याप्रकरणी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गावात पोलिसांचे एक पथक तैनात करण्यात आले आहे.