कुस्तीपटू आणि हरियाणाच्या जुलाना विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार विनेश फोगटने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. नायब सिंह सैनी सरकारने विनेशला ४ कोटी रुपये देण्याची घोषणा केली, त्यानंतर काही लोकांनी सरकारकडून पुरस्कार स्वीकारल्याबद्दल सोशल मीडियावर तिला लक्ष्य केलं. यावर आता विनेश फोगटने पलटवार केला आहे.
आपल्या ट्विटर अकाऊंटवरून निशाणा साधला आहे. "२ रुपयांसाठी ट्विट करणाऱ्या आणि मोफत ज्ञान देणाऱ्या लोकांनी जरा लक्षपूर्वक ऐका! तुमच्या माहितीसाठी, मी तुम्हाला सांगते, आतापर्यंत मी कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स नाकारल्या आहेत. सॉफ्ट ड्रिंक्सपासून ते ऑनलाइन गेमिंगपर्यंत, पण मी माझ्या तत्त्वांशी कधीही तडजोड केलेली नाही.
“मी माझ्या पूर्वजांकडून शिकले आहे”
"मी जे काही साध्य केलं आहे ते मी प्रामाणिकपणे कठोर परिश्रम आणि माझ्या प्रियजनांच्या आशीर्वादाने केलं आहे. मला त्याचा अभिमान आहे. मी भारतमातेची लेक आहे. मी माझ्या पूर्वजांकडून शिकले आहे. हक्क , अधिकार हे हिसकावून घेतले जात नाहीत, जेव्हा आपला माणूस संकटात असतो तेव्हा त्याच्यासोबत खंबीरपणे कसं उभं राहायचं हे देखील माहित असतं."
"मी कुठेही जाणार नाही”
"त्यामुळे गप्प बसा. एका कोपऱ्यात बसा आणि जे सर्वोत्तम आहे ते करा. रडा, रडा, रडा आणि फक्त रडा! कारण मी कुठेही जाणार नाही. मी इथेच राहणार आहे, जमिनीनी जोडली गेली आहे आणि स्वाभिमानाने उभी आहे" असं विनेश फोगटने म्हटलं आहे.