Rajasthan Crime: बेघरांना आश्रय देण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री आवास योजना सारख्या कल्याणकारी योजना सुरू केल्या होत्या. मात्र काही भ्रष्ट अधिकारी त्यांच्या पातळीवर या योजनांची योग्य अंमलबजावणी होण्यापासून रोखतात. त्यामुळे अशा योजनांमध्ये अनेकदा भ्रष्टाचार वाढतो. राजस्थानच्या अजमेरमध्ये असाच एक प्रकार समोर आला. पंतप्रधान आवास योजनेसाठी लाच घेतल्याबद्दल एका महिला ग्रामविकास अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
एका तक्रारदाराने अजमेर येथील एसीबीकडे तक्रार दाखल केली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. तक्रारीत त्याने दावा केला की, ग्रामविकास अधिकारी सोनाक्षी यादव यांनी पीएमएवाय अंतर्गत घरासाठी निधी देण्याच्या बदल्यात २,५०० लाच मागितली. सुरुवातीला त्यांनी १,००० दिले. पण सोनाक्षी यादव तिथेच थांबल्या नाहीत. त्यांनी आणखी १,५०० ची मागणी केल्याचा आरोप तक्रारदाराने केला.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, आरोपी सोनाक्षी यादवने गृहनिर्माण योजनेच्या लाभार्थ्याला धमकीही दिली. सोनाक्षी यांनी सांगितले की पूर्ण रक्कम दिल्याशिवाय घर मंजूर होणार नाही. यादव यांची वाढती मागणी पाहून लाभार्थ्याने एसीबीकडे तक्रार केली. तक्रार मिळताच एसीबीच्या महासंचालक स्मिता श्रीवास्तव यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तात्काळ एक पथक स्थापन केले. पोलीस उपमहानिरीक्षक अनिल कायल यांच्या देखरेखीखाली आणि पोलीस निरीक्षक कांचन भाटी यांच्या नेतृत्वाखाली, अजमेर एसीबीच्या पथकाने कारवाई केली. पथकाने एक योजना आखली, ज्यानुसार सोनाक्षी यादवला १,००० लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं.
दरम्यान, अटकेनंतर एसीबीचे पथक सोनाक्षी यादवची चौकशी करत आहे. यादव विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे. पुढील तपासात यामागे मोठे नेटवर्क आहे का हे उघड होण्याची शक्यता आहे.