निलंबित अधिकाऱ्याच्या घरी दक्षता पथकाची धाड; कोट्यवधींची संपत्ती, अधिकारीही चक्रावले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 13:34 IST2024-12-15T13:33:36+5:302024-12-15T13:34:14+5:30
निलंबित असलेल्या अधिकाऱ्याच्या घरी दक्षता विभागाने धाड टाकली. या धाडीत अधिकाऱ्याने अवैध मार्गाने कमावलेल्या कोट्यवधी संपत्तीचे आकडे बघून अधिकारीही चक्रावले.

निलंबित अधिकाऱ्याच्या घरी दक्षता पथकाची धाड; कोट्यवधींची संपत्ती, अधिकारीही चक्रावले!
उत्तर प्रदेशातील गौतम बुद्धनगर जिल्ह्यातील नोएडा विकास प्राधिकरणाचे विशेष कार्य अधिकारी रविंद्र सिंह यादव यांच्या नोएडा आणि इटावा येथील ठिकाणांवर दक्षता विभागाने धाडी टाकल्या. तब्बल १८ तास झाडाझडती सुरू होती. धाडीत रविंद्र यादव यांच्या १६ कोटी रुपये किंमतीच्या घरातून ६० लाखांचे दागिने, अडीच लाख रोख रक्कम जप्त करण्यात आली. दक्षता विभागाचे अधिकारी शनिवारी (१४ डिसेंबर) नोएडा स्थित घरी आणि इटावा येथील त्यांच्या शाळेत पोहोचले होते. रविंद्र यादव सध्या निलंबित आहेत.
उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती प्रकरणी दक्षता पथकाने रविंद्र सिंह यादव यांच्याविरोधात कारवाई केली. अधिकाऱ्यांनी तपास केल्यानंतर यादव यांच्याकडे उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याचे समोर आले होते. याबद्दलचा अहवाल सरकारकडे पाठवण्यात आला होता. रविंद्र यादव यांच्याविरोधात भ्रष्टाचार विरोधी कायद्यान्वये उत्तर प्रदेश दक्षता विभागाने गुन्हा दाखल केला होता.
न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर टाकली धाड
दक्षता विभागाने न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर रविंद्र सिंह यादव यांच्या घरावर आणि शाळेवर धाड टाकली. दक्षता पथकाच्या पथकांनी १४ डिसेंबर रोजी धाड टाकत झाडाझडती सुरू केली होती. नोएडा सेक्टर ४७ मधील तीन मजली घरी दक्षता पथकाला ६० लाखांहून अधिक किंमतीचे दागिने मिळाले. अडीच लाख रोख रक्कम पथकाने जप्त केले आहेत.
रविंद्र यादव राहतात त्या घराची किंमत १६ कोटी रुपये असून, घरात लावण्यात आलेल्या वेगवेगळ्या वस्तूंची किंमत ३७ लाखांपर्यंत आहे. रविंद्र यादव यांच्या घरी दक्षता पथकाला पासपोर्ट मिळाले आहेत. रविंद्र सिंह यादव यांच्या कुटुंबीयांना केलेल्या परदेश दौऱ्याचा आता अधिकाऱ्यांकडून तपास केला जात आहे.
रविंद्र यादव यांच्याकडे दोन कार आहेत. एक इनोव्हा आणि एक क्विड. याबद्दलची माहितीही आता मिळवली जात आहे. यादव यांचे वेगवेगळ्या बँकांमध्ये ६ खाती आहेत. पॉलिसी आणि गुंतवणुकीसंदर्भातील कागदपत्रेही झाडाझडती दरम्यान मिळाली आहेत.
जमिनीची खरेदी, १५ कोटींची शाळा
आरोपी रविंद्र यादव यांनी १२ एकरपेक्षा अधिक जमीन खरेदी केलेली असल्याचे कागदपत्रेही दक्षता विभागाला मिळाले आहेत. घरात इटावातील मलाजनी येथे असलेल्या अॅरिस्टॉटल स्कूलची कागदपत्रे मिळाली. जागेसह शाळेची किंमत १५ कोटी रुपये आहे. शाळेचा अध्यक्ष रविंद्र यादव यांचा मुलगा निखिल यादव आहे. शाळेत एसी सिस्टिम असून, इतर उपकरणे आणि फर्निचरची किंमत २ कोटी रुपये आहे. शाळेच्या दहा बसेस आहेत.
रविंद्र यादव २००७ मध्ये नोएडा प्राधिकरणमध्ये विशेष कार्य अधिकारी होते. त्यावेळी आयसीएसआरसाठी संपादित केलेल्या ९७१२ मीटर सरकारी जागा एका खासगी गृहनिर्माण सोसायटीला नियमांचे उल्लंघन करून दिली होती, असा त्यांच्यावर आरोप आहे. याचा तपास सीबीआयकडून करण्यात आला आहे.