Video : घरात लाईट नाही म्हणून एटीएममध्येच थाटला संसार; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 15:27 IST2025-05-22T15:10:20+5:302025-05-22T15:27:30+5:30
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जयंती कुशवाहा नावाची महिला तिच्या तिन्ही मुलांसोबत एटीएमच्या केबिनमध्ये झोपलेली दिसत आहे.

Video : घरात लाईट नाही म्हणून एटीएममध्येच थाटला संसार; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ
Viral Video : उत्तर प्रदेशातील झांसीमध्ये प्रचंड उष्णतेच्या काळात सतत वीजपुरवठा खंडित राहिल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या अत्यंत कठीण परिस्थितीत एका कुटुंबाने उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अनोखा मार्ग शोधला. या कुटुंबातील महिलेने आपल्या तिन्ही मुलांसहित एटीएममध्ये बस्तान मांडले.
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जयंती कुशवाहा नावाची महिला तिच्या तिन्ही मुलांसोबत एटीएमच्या केबिनमध्ये झोपलेली दिसत आहे. याच कारण म्हणजे त्यांच्या घरात वीज नाही. यावर जयंती कुशवाहा म्हणतात की, “घरात वीजच नाही. रात्र-दिवस उष्णतेत राहता येत नाही. निदान एटीएममध्ये वीज आहे आणि एसी चालू आहे, म्हणून आम्ही इथे येतो. रस्त्यावर झोपणं शक्य नाही, त्यामुळे मुलांना घेऊन इथेच बसतो.”
एक महिना उलटला वीजपुरवठा नाही!
जयंतीने सांगितले की, ही समस्या एक-दोन दिवसांची नसून गेल्या महिन्याभरापासून वीजपुरवठा अपुरा आहे, आणि वीज विभागाकडून कोणतीही ठोस माहिती दिली जात नाही. दरम्यान, झाशीच्या अनेक भागांतील रहिवाशांनी वीज नसल्यामुळे निषेध व्यक्त केला आहे.
नागरिकांचा संताप आणि रस्त्यावरचे आंदोलन
१८ मे रोजी काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रदीप जैन यांनी स्थानिक कार्यकर्त्यांसोबत वीज विभागाच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं. मुख्य अभियंता मोहम्मद सगीर यांच्या कार्यालयाला तब्बल सात तास घेराव घालण्यात आला. यावेळी मुख्य अभियंत्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, ही समस्या अतिरिक्त लोडमुळे (लोड शेडिंग) निर्माण झाली असून लवकरच सुधारणा केली जाईल.
In UP's Jhansi, locals struggling with massive power cuts for the past month have now sought refuge at an ATM. pic.twitter.com/hszYyc67pN
— Piyush Rai (@Benarasiyaa) May 20, 2025
सामाजिक माध्यमांवर संतापाचा उद्रेक
सदर व्हिडीओ Benarasiyaa या हँडलने शेअर केला असून, त्याला हजारो व्ह्यूज आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. नेटकऱ्यांनी उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (UPPCL) वर जोरदार टीका केली. एका युजरने लिहिले, “युपीपीसीएल हा सर्वात भ्रष्ट विभाग आहे. त्याचे त्वरित खाजगीकरण करा.” दुसरा म्हणतो की, “केंद्र सरकार भरपूर निधी देतं, पण झांसीत मुलभूत सेवा का मिळत नाहीत?”