Video patna ink attack on union minister ashwini chaubey during pmch visit | केंद्रीय मंत्र्यावर अज्ञाताने फेकली शाई, पाहा व्हिडीओ
केंद्रीय मंत्र्यावर अज्ञाताने फेकली शाई, पाहा व्हिडीओ

ठळक मुद्देकेंद्रीय मंत्र्यावर अज्ञाताने शाई फेकल्याची घटना समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी चौबे यांच्यावर शाईफेक करण्यात आली.'जनता, लोकशाहीवर ही शाईफेक करण्यात आली आहे' अशी प्रतिक्रिया अश्विनी चौबे यांनी घटनेनंतर माध्यमांना दिली.

पटना - केंद्रीय मंत्र्यावर अज्ञाताने शाई फेकल्याची घटना समोर आली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी चौबे यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. मंगळवारी  पटना मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल (पीएमसीएच) मध्ये चौबे डेंग्यू झालेल्या रुग्णांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर शाई फेकली आहे. घटनेनंतर शाईफेक करणारी व्यक्ती फरार झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (15 ऑक्टोबर) केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी पाटना येथील एका हॉस्पिटलला भेट दिली. पटना मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमधील डेंग्यू झालेल्या रुग्णांच्या तब्येतीची त्यांनी चौकशी केली. त्याच दरम्यान एका व्यक्तीने चौबे यांच्यावर शाईफेक केली आहे. या घटनेनंतर शाई फेकणारी व्यक्ती फरार झाली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 

'जनता, लोकशाहीवर ही शाईफेक करण्यात आली आहे' अशी प्रतिक्रिया अश्विनी चौबे यांनी घटनेनंतर माध्यमांना दिली आहे. अश्विनी चौबे हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी पाटना येथे झालेल्या मुसळधार पावसाबाबत वक्तव्य केलं होतं. तसेच एका पोलीस कर्मचाऱ्याला धमकी दिल्याचं समोर आलं होतं. 

चौबे यांनी याआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. 2019 नंतर राहुल गांधींना स्मशानात पोहोचवण्यासाठीही चार लोक मिळणार नाहीत, असे वक्तव्य चौबे यांनी केले होते. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेर आहेत. आता राहुल गांधींनी सव्वाशेर बनण्याचा प्रयत्न करू नये. काँग्रेस अध्यक्ष लोकसभेमध्ये गप्प बसून असतात. त्यांच्या बोलण्यामध्ये काहीच तथ्य नसते. पुढच्या वेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात एक सशक्त आणि भक्कम असे रालोआचे सरकार बनेल. तर काँग्रेस चारीमुंड्या चीत होईल. त्यानंतर काँग्रेस पक्षाला स्मशानात घेऊन जाण्यासाठीही चार जण मिळणार नाहीत' असं अश्विनी चौबे यांनी म्हटलं होतं. तसेच राहुल गांधी यांनी गरिबी पाहिलेली नाही. तसेच राहुल गांधींच्या खानदानाने महिलांचे किती शोषण केले आहे ते सुद्धा त्यांना ठावूक नाही आहे, असा टोलाही चौबे यांनी यावेळी लगावला होता. 


Web Title: Video patna ink attack on union minister ashwini chaubey during pmch visit
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.