गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 12:09 IST2025-11-12T11:42:06+5:302025-11-12T12:09:14+5:30
दिल्लीत झालेल्या भीषण स्फोटाचा व्हिडीओ समोर आला असून यानंतर सीसीटीव्ही देखील बंद पडले.

गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
Delhi Blast CCTV: १० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार स्फोटाचा 'तो' हादरवणारा क्षण पहिल्यांदाच समोर आला आहे. संशयित दहशतवादी उमर नबी याच्या गाडीत स्फोट होतानाचे सीसीटीव्ही फुटेज आता तपास यंत्रणांच्या हाती लागले आहे, ज्यामुळे या घटनेच्या तीव्रतेची कल्पना येते. सोमवार संध्याकाळी, राजधानी दिल्लीत झालेल्या या स्फोटात किमान १० लोकांचा जागीच मृत्यू झाला, तर २० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते.
चांदणी चौकावर देखरेख करणाऱ्या सीसीटीव्ही कंट्रोल रूममध्ये कैद झालेल्या फुटेजमध्ये स्फोटाचे भयानक दृश्य दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये १० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजून ५० मिनिटे आणि ५२ सेकंदाची वेळ दिसत आहे. अंधार पडलेला असताना, लाल किल्ल्याच्या चौकात ट्रॅफिक सिग्नलजवळ गाड्यांची (कार, बाईक, ऑटो) मोठी गर्दी होती आणि वाहने हळू हळू पुढे सरकत होती. याच वेळी, संशयित दहशतवादी उमर नबी चालवत असलेल्या कारमध्ये अचानक स्फोट झाला आणि आगीचा एक मोठा गोळा आकाशात तयार झाल. त्यानंतर सर्वत्र अंधार पसरला. चार वेगवेगळ्या ठिकाणांहून कॅप्चर झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे स्फोटाची घटना आणि त्यानंतर झालेले नुकसान याचा अंदाज लावता येऊ शकतो.
VIDEO | CCTV footage captures the exact moment of the blast near Delhi's Red Fort.
— Press Trust of India (@PTI_News) November 12, 2025
A blast took place in a slow-moving car at a traffic signal near the Red Fort metro station on Monday evening, killing 12 people, injuring many and gutting several vehicles.
(Source: Third Party)… pic.twitter.com/xjpScNpJ5Y
प्राथमिक तपासात स्फोटकांनी भरलेली कार जाणीवपूर्वक वर्दळीच्या चौकात नेण्यात आली होती. तपासात असेही दिसून आले की उमरने हा स्फोट साथिदारांच्या अटकेनंतर भीतीने केला होता. जैशचा संशयित दहशतवादी उमर याच्या कारमध्ये झालेल्या या स्फोटामुळे काही क्षणातच संपूर्ण परिसर स्तब्ध झाला. या स्फोटाची अनेक वाहनांना झळ बसली. एवढेच नाही तर घटनास्थळापासून १०० मीटर अंतरावर मृतदेहांचे अवयव फेकले गेले. स्फोट इतका भीषण होता की तिथले सीसीटीव्ही देखील बंद झाले.
लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर १ जवळील ट्रॅफिक सिग्नलवर हा स्फोट झाला, ज्यामुळे अनेक वाहने पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. तपास यंत्रणांच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, लाल किल्ल्याजवळ झालेला हा कार स्फोट एका मोठ्या कटाचा भाग होता. या कटाचे मॉड्यूल फरीदाबादमधून कार्यरत असलेल्या 'व्हाइट कॉलर' दहशतवादी नेटवर्ककडून केले जात होते. या नेटवर्कचे धागेदोरे जम्मू-काश्मीरमधील डॉक्टरांशी जोडलेले आहेत. या मॉड्यूलमध्ये डॉक्टर, मौलवी आणि उच्चशिक्षित व्यावसायिक लोकांचा सहभाग होता. स्फोट झालेली कार हा याच मॉड्यूलचा सूत्रधाल असलेला संशयित दहशतवादी डॉ. उमर नबी चालवत होता.