इंडो तिबेटियन पोलीस दलाच्या जवानांना आणण्यासाठी निघालेल्या बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (३० जुलै) गांदरबल जिल्ह्यातील कुल्लनमध्ये घडली. बस जवानांना आणण्यासाठी जात होती. त्यावेळी बस अनियंत्रित झाली आणि सिंध नदीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफच्या जवानांनी बचाव कार्य हाती घेतले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गांदरबल जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. नद्यांच्या पाणीपातळीवर वाढ झालेली असून, पाऊस सुरू असतानाच बस जवानांना आणण्यासाठी निघाली होती. बस अचानक अनियंत्रित झाली आणि सिंध नदीत कोसळली.
नदीत कोसळलेल्या बसचा व्हिडीओ
आयटीबीपी जवानांचा शोध सुरू
सुदैवाने नदीत कोसळलेल्या बसमध्ये जवान नव्हते. जवानांना घेऊन येण्यापूर्वीच ती ही घटना घडल्याने मोठी जीवितहानी टळली. बस सिंध नदीत कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून एसडीआरएफच्या जवानांचे पथक घटनास्थळी पाठवण्यात आले.
गांदरबलचे पोलीस अधीक्षक खलील अहमद पोसवाल यांनी सांगितले की, "आयटीबीपीची बस जवानांना आणण्यासाठी जात होती. बस घसरली आणि सिंध नदीत कोसळली. या घटनेत चालक जखमी झाला आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफसह पोलिसांचे पथक मदत कार्यात गुंतले आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली."
अहमद अली मोहम्मद दार असे जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे. बसमधून चालकाला जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आल्यानंतर कुल्लन येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या बसमध्ये शस्त्रे होती. ती वाहून गेली आहेत. तीन रायफली नदीत मिळाल्या असून, इतर रायफलींचा शोध घेतला जात आहे.