Video :'दाऊद'ला पकडलं! दिल्ली पोलिसांनी शेअर केला 'तो' व्हिडिओ; सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 13:43 IST2026-01-21T13:42:43+5:302026-01-21T13:43:17+5:30
नॅशनल हायवे-४८वर काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्या एका माथेफिरू चालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Video :'दाऊद'ला पकडलं! दिल्ली पोलिसांनी शेअर केला 'तो' व्हिडिओ; सोशल मीडियावर व्हायरल
रस्त्यावर गाड्या चालवताना नियमांचे भान नसलेल्या स्टंटबाजांना आता दिल्ली पोलिसांनी कडक इशारा दिला आहे. नॅशनल हायवे-४८वर काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्या एका माथेफिरू चालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, या स्कॉर्पिओच्या पाठीमागे मोठ्या अक्षरात 'दाऊद' असे लिहिलेले होते, ज्यामुळे या प्रकरणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती.
काय आहे नेमका प्रकार?
ही घटना १८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ ते ४च्या दरम्यान जीटी करनाल बायपास रोडवर घडली. एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ चालकाने भरधाव वेगात इतर गाड्यांना ओव्हरटेक करत 'झिग-झॅग' पद्धतीने गाडी चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घातला होता. या स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. व्हिडिओमध्ये ही गाडी इतक्या धोकादायक पद्धतीने वळण घेत होती की, मोठा अपघात होण्याची दाट शक्यता होती.
पोलिसांची सुपरफास्ट कारवाई
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच दिल्ली पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. समयपूर बादली पोलिसांनी तपास चक्रे फिरवून अवघ्या काही तासात आरोपी चालकाचा शोध लावला. जामिया नगरमध्ये राहणाऱ्या २१ वर्षीय दाऊद अंसारी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही स्कॉर्पिओ दाऊदचे वडील मुसाफिर अंसारी यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. पोलिसांनी ही आलिशान गाडी जप्त केली असून दाऊदचा परवानाही रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
दिल्ली पोलिसांनी शेअर केला व्हिडिओ
या कारवाईची माहिती दिल्ली पोलिसांनी आपल्या अधिकृत हँडलवरून दिली आहे. "रस्त्यावर स्टंटबाजी करून इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांची गय केली जाणार नाही," असा संदेश पोलिसांनी या कारवाईतून दिला आहे. आरोपी दाऊद अंसारी विरोधात भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Taking cognizance of a viral video circulating on social media, the team of PS Samaypur Badli, @dcp_outernorth took swift action .
— Delhi Police (@DelhiPolice) January 20, 2026
The offending vehicle, which was being driven recklessly & dangerously, has been seized and the driver has been arrested for rash & negligent… pic.twitter.com/FIr8HbR9Za
अपघाताचे सावट टळले
ज्या वेळी ही स्कॉर्पिओ हायवेवर धावत होती, त्या वेळी रस्त्यावर वाहतूक गर्दी होती. चालकाच्या एका चुकीच्या वळणामुळे अनेक गाड्यांचा विचित्र अपघात झाला असता. मात्र, वेळेत मिळालेली माहिती आणि पोलिसांनी दाखवलेली तत्परता यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. सध्या आरोपी दाऊद पोलिसांच्या कोठडीत असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.