Video - पावसाचा प्रकोप! मध्य प्रदेशमध्ये ४०० वर्षे जुनी भिंत कोसळली, ७ जणांचा मृत्यू, २ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 15:16 IST2024-09-12T15:14:18+5:302024-09-12T15:16:30+5:30
दतियामध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. राजगड किल्ल्याच्या खालच्या भागातील ४०० वर्षे जुनी भिंत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या

Video - पावसाचा प्रकोप! मध्य प्रदेशमध्ये ४०० वर्षे जुनी भिंत कोसळली, ७ जणांचा मृत्यू, २ जण जखमी
मध्य प्रदेशातील दतियामध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. राजगड किल्ल्याच्या खालच्या भागातील ४०० वर्षे जुनी भिंत कोसळल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. एकाच कुटुंबातील पाच जणांनी आपला जीव गमावला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्ती निवारण पथक घटनास्थळी पोहोचलं आणि बचावकार्य सुरू केलं.
दतिया येथील खलकापुरा परिसरात ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, भिंत कोसळताच घरात उपस्थित असलेले सर्व नऊ लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. आजूबाजूच्या लोकांनी तातडीने ढिगारा हटवून दोन जणांना बाहेर काढलं. मात्र उर्वरित सात जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यास उशीर झाला. शेजाऱ्यांनीच पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.
दतिया में गिरी जर्जर दीवार, 9 दबे, 2 की मौत, रेस्क्यू जारी
— Nitinthakur (Abp NEWS) (@Nitinreporter5) September 12, 2024
- दीवार में दबे 3 परिवार के सदस्य pic.twitter.com/IV6mpMIg5I
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मात्र, बचावकार्यात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी गोंधळ घातला. या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये निरंजन वंशकर, त्यांची पत्नी ममता, मुलगी राधा, दोन मुलं सूरज आणि शिवम याशिवाय निरंजनची बहीण प्रभा आणि तिचा नवरा किशन यांचा समावेश आहे.
या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांच्याही पायाला व शरीराच्या इतर भागात गंभीर दुखापत झाली आहे. बचाव मोहिमेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण घटनेची माहिती राज्य सरकारला दिली. यानंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली.