VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 20:37 IST2025-04-24T20:20:04+5:302025-04-24T20:37:44+5:30

Attari Wagah Border: जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची गोळ्या झाडून ...

Video Changes in the retreat ceremony at Attari Wagah border gates remain closed both commanders will not shake hands | VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी

VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी

Attari Wagah Border: जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या केली आणि पळ काढला. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहिम हाती घेतली आहे. सरकारनेही पाकिस्तानविरोधात कडक पावले उचचली आहेत. सिंधू करार स्थगित करण्यासोबत भारताने पाच मोठे निर्णय घेतले. दुसरीकडे या दहशतवादी हल्ल्याचा परिणाम अटारी वाघा सीमेवरही पाहायला मिळाला. भारत सरकारने अटारी बॉर्डरजवळील चेकपोस्ट बंद केली आहे. त्यानंतर अटारी बॉर्डरवर दररोज होणाऱ्या रिट्रीट सेरेमनीमध्ये बदल पाहायला मिळाला.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, पंजाबमधील अटारी, हुसैनीवाला आणि सदकी येथे रिट्रीट समारंभात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. सीमा सुरक्षा दलाच्या पंजाब फ्रंटियरने दिलेल्या माहितीनुसार अटारी-वाघा सीमेवर रिट्रीट सेरेमनी दरम्यान भारतीय गार्ड कमांडर आणि पाकिस्तानी गार्ड कमांडर यांच्यात प्रतीकात्मक हस्तांदोलनाची परंपरा बंद केली जाईल. याशिवाय, कार्यक्रमादरम्यान दरवाजे देखील बंद राहतील. पहलगाममधील अलिकडच्याच दुःखद हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, पंजाबमधील अटारी, हुसैनीवाला आणि सदकी येथे रिट्रीट सेरेमनीच्या वेळी होणाऱ्या समारंभ मर्यादित स्वरुपाचा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असे  पंजाब फ्रंटियरने सांगितले.

त्यानुसार संध्याकाळी अटारी-वाघा सीमेवर दररोज होणाऱ्या रिट्रीट सेरेमनीमध्ये बदल दिसून आला. नेहमी बीएसएफ आणि पाक रेंजर्सच्या जवानांमध्ये  औपचारिक हस्तांदोलन होते. परंतु यावेळी ना दरवाजे उघडले गेले आणि ना हस्तांदोलन झाले. अटारी सीमेवर झालेल्या रिट्रीट सेरेमनीमध्ये दोन्ही देशांचे दरवाजे उघडले गेले नाहीत. दोन्ही देशांचे झेंडे बंद दरवाज्यांमध्ये खाली उतरवण्यात आले. बीएसएफ जवानांनी पाक रेंजर्सशी हात मिळवले नाहीत. तसेच आजच्या समारंभात लोकांची संख्याही कमी होती. यााधी दररोज सुमारे २० हजार लोक उपस्थित असत. मात्र आज केवळ १० हजार लोक उपस्थित होते.

दरम्यान, २६ लोकांच्या मृत्यूनंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध कडक पावले उचलली आहेत. यामध्ये पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत देश सोडण्यास सांगितले . त्यानुसार आज १०५ भारतीय पाकिस्तानातून भारतात परतले. त २८ पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानात परतले आहेत. पाकिस्तानी नागरिकांना दिले जाणारे वैद्यकीय व्हिसा फक्त २९ एप्रिल पर्यंत वैध असतील. देशात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा कालावधी संपण्यापूर्वी भारत सोडावा लागणार आहे.
 

Web Title: Video Changes in the retreat ceremony at Attari Wagah border gates remain closed both commanders will not shake hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.