हाहाकार! आसाममधील 20 जिल्ह्यांना पुराचा फटका; 2 लाख लोक बेघर, जनजीवन विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 17:33 IST2022-05-17T17:32:45+5:302022-05-17T17:33:58+5:30
Assam Flood : आसाममधील 20 जिल्ह्यांतील सुमारे 2 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.

हाहाकार! आसाममधील 20 जिल्ह्यांना पुराचा फटका; 2 लाख लोक बेघर, जनजीवन विस्कळीत
नवी दिल्ली - दिल्ली, यूपीसह उत्तर भारतातील बहुतांश राज्यांतील लोक सध्या कडक उन्हामुळे हैराण झाले आहेत. त्यांना उन्हाचा त्रास होत आहे. पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण देशातील एका राज्यात पावसाने भीषण परिस्थिती निर्माण केली आहे. आसाममधील 20 जिल्ह्यांतील सुमारे 2 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. भूस्खलन झाल्यामुळे रेल्वे आणि रस्ते संपर्क तुटला आहे. सोशल मीडियावर लोक आसाममधील पूरग्रस्तांसाठी प्रार्थना करत आहेत.
दिमा हासाओ पर्वतीय जिल्ह्याचा देशाच्या इतर भागाशी संपर्क तुटला आहे. मंगळवारी सकाळपर्यंत किमान 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हटले आहे की होजाईमधील 78,157 आणि कछारमधील 51,357 लोकांना पुराचा फटका बसला आहे. भूस्खलन आणि पावसामुळे ट्रॅकवर पाणी साचले असल्याची माहिती ईशान्य सीमा रेल्वेने दिली आहे.
आसामच्या लुमडिंग-बदरपूर हिल विभागात दोन दिवसांपासून दोन गाड्या अडकल्या होत्या. हवाई दलाच्या मदतीने सुमारे 2800 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. दक्षिण आसाम, त्रिपुरा आणि मिझोरामसाठीचे रेल्वे मार्ग गेल्या 2 दिवसांपासून बंद आहेत. गुवाहाटीतील बहुतांश भागात चार-पाच दिवसांपासून पाणी साचले आहे. शुक्रवारपासून राज्यभरात पाऊस पडत आहे. शहरातील अनेक भागात रस्त्यांवर चिखल साचल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
गुवाहाटी विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक ए के भगवती यांनी शहरी पुरावर खूप अभ्यास केला आहे. ते म्हणाले की, ज्या भागात पूर आणि पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे ते एकेकाळी ओलसर होते. शहर वाढल्याने सखल भागात बांधकामेही वाढली. जलद शहरीकरणामुळे पाणथळ जागा कमी झाल्या आणि काँक्रीट क्षेत्र वाढले ज्यामुळे शहरात पूर आला. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.