नवी दिल्ली - उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी.पी राधाकृष्णन यांचा विजय झाला आहे. राधाकृष्णन यांना ४५२ मते पडली. त्यामुळे निवडणुकीनंतर क्रॉस व्होटिंगची चर्चा सुरू झाली आहे. भाजपाने विरोधी पक्षातील खासदारांना धन्यवाद देत या चर्चेला आणखी हवा दिली. याआधीही भाजपाने विरोधी पक्षातील मते फुटतील आणि राधाकृष्णन यांना मिळतील असा दावा केला होता. परंतु हे चित्र स्पष्ट झाले नाही की, अखेर विरोधकांमधील कोणत्या पक्षातील खासदारांनी सुदर्शन रेड्डी यांच्याविरोधात मतदान केले.
सभागृहात भाजपा नेतृत्वातील एनडीए आघाडीकडे ४२७ खासदारांचे पाठबळ आहे. त्यात वायएसआर काँग्रेसचे ११ खासदार यांनी सी.पी राधाकृष्णन यांना पाठिंबा दिला होता. काही छोट्या पक्षांनीही एनडीए उमेदवाराला साथ दिली. सी.पी राधाकृष्णन यांना विजयासाठी ३७७ मतांची गरज होती. अंतिम निकालात त्यांना ४४० मते मिळतील अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात निकाल आले तेव्हा एनडीए उमेदवाराच्या खात्यात ४५२ मते मिळाली तर विरोधकांच्या ३१५ खासदारांनी मतदान केले. रेड्डी यांना ३०० मते मिळाली तर १५ मते बाद ठरवली असं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.
तर काही विरोधी खासदारांनी जाणुनबुजून चुकीचे मतदान केले, कमीत कमी १५ खासदारांनी राधाकृष्णन यांच्या बाजूने मतदान केले असा दावा भाजपाने केला. मतदान प्रक्रियेत सहभागी असलेल्या एका भाजपा नेत्याने महाराष्ट्र आणि झारखंड शिवाय राजस्थानातील काही खासदारांनी राधाकृष्णन यांना मतदान केल्याचे म्हटले. सी.पी राधाकृष्णन झारखंड आणि महाराष्ट्र दोन्ही राज्याचे राज्यपाल होते. भाजपा नेतृत्वातील महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्णन यांच्या पाठिंब्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. एका माध्यमाशी बोलताना विरोधी पक्षातील एका खासदाराने क्रॉस व्होटिंगची अपेक्षा होती असं म्हटलं.
आम्हाला माहिती होते, काही जण पलटी मारतील. कारण रेड्डी यांच्या जिंकण्याची शक्यता कमी होती. विरोधी आघाडीची सत्ताधारी आघाडीशी तुलना होऊ शकत नाही. परंतु काय होऊ शकते हे पाहणे रंजक असेल असं विरोधी पक्षातील एका खासदाराने निकालाआधी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. काही नेत्यांनी आम आदमी पार्टी, महाविकास आघाडीतील खासदारांवर संशय घेतला. आप आणि उद्धवसेनेने त्यांच्यावरील आरोप फेटाळला. त्याशिवाय मतदान गुप्त होतं, मग मते फुटली हे तुम्हाला कसं कळलं? काहीतरी गोलमाल आहे. १४ मते कुठल्या राज्यातील आहेत, फुटले म्हणजे महाराष्ट्रातील फुटले असं म्हटलं जाते. महाराष्ट्राची का बदनामी करताय? असा सवाल करत राजकारण करा पण मराठी माणसाला बदनाम करू नका असं प्रत्युत्तर सुप्रिया सुळे यांनी भाजपा-शिंदेसेनेला दिले आहे.