बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 12:11 IST2025-12-23T12:04:00+5:302025-12-23T12:11:23+5:30
बांगलादेशी हिंदू तरुण दीपू चंद्र दास यांच्या मृत्यूचे प्रकरण तापत आहे. विश्व हिंदू परिषदेने (VHP) दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने सुरू केली आहेत.

बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
बांगलादेशच्या मयमनसिंह जिल्ह्यातील हिंदू युवक दीपू चंद्र दास याची जमावाने अमानुषपणे हत्या करून मृतदेह झाडाला बांधून जाळल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाले. दरम्यान, आता या घटनेचे पडसाद भारतात उमटले आहेत. विश्व हिंदू परिषदेने (VHP) आजपासून दिल्लीत निदर्शने सुरू केली आहेत.
दीपू चंद्राची हत्या प्रकरणी बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर गोंधळ सुरू झाला आहे. पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी करत आज सकाळी ११ वाजल्यापासून कार्यकर्ते बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर जमले आहेत. दरम्यान, बांगलादेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या, विशेषतः वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढत आहे.
दरम्यान, बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले आहे. भारतीय उच्चायुक्तांना बोलावण्याची आठवडाभरातील ही दुसरी वेळ आहे. बांगलादेशी विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर आणि त्यानंतर दीपू यांच्या जमावाने केलेल्या मारहाणीनंतर झालेल्या भारतविरोधी निदर्शनांमुळे दोन्ही देशांमधील संबंध लक्षणीयरीत्या बिघडले आहेत.
दोन दिवसांपूर्वी दिल्लीतही एक निदर्शन
शनिवारी रात्री बांगलादेशात एका हिंदू तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. निदर्शने खूपच लहान आणि शांततापूर्ण होती आणि त्यामुळे बांगलादेश उच्चायुक्तालयाच्या सुरक्षेला कोणताही धोका नव्हता, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. निदर्शनात फक्त २० ते २५ तरुण सहभागी होते.
बांगलादेशातही दिपूला न्याय मिळावा अशी मागणी
२२ डिसेंबर २०२५ रोजी, बांगलादेशात दिपूच्या हत्येविरोधात हिंदू संघटना आणि अल्पसंख्याक गटांनी ढाका येथील राष्ट्रीय प्रेस क्लबसमोर निदर्शने केली. निदर्शकांनी सांगितले की दिपू निर्दोष होता आणि त्याच्यावर ईशनिंदेचा खोटा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्याला क्रूरपणे मारहाण करण्यात आली, झाडाला लटकवण्यात आले आणि नंतर कट्टरपंथियांनी जिवंत जाळले.
निदर्शकांनी सांगितले की, बांगलादेशातील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. या वर्षी जानेवारीपासून ५० हून अधिक गैर-मुस्लिमांची हत्या करण्यात आली आहे.