अवकाशातून अत्यंत स्पष्ट फोटो मिळाले असते, पण...; पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम अयशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 08:27 IST2025-05-19T08:26:39+5:302025-05-19T08:27:34+5:30
इस्रोची ही १०१वी मोहीम होती. नियोजित वेळेनुसार रविवारी सकाळी ११:५९ वाजता पीएसएलव्हीने उड्डाण केले. परंतु...

अवकाशातून अत्यंत स्पष्ट फोटो मिळाले असते, पण...; पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम अयशस्वी
श्रीहरिकोटा : पृथ्वी निरीक्षण उपग्रहाच्या (ईओएस-०९) प्रक्षेपणाची भारतीय अवकाश संशोधन संस्थेची (इस्रो) मोहीम रविवारी अपयशी ठरली. ध्रुवीय प्रक्षेपण यान - पीएसएलव्ही सी-६१च्या साहाय्याने हे प्रक्षेपण करण्यात आले. मात्र, तिसऱ्या टप्प्यात या रॉकेटमध्ये दाबाची समस्या उद्भवल्याने ही मोहीम पूर्ण होऊ शकली नाही.
इस्रोची ही १०१वी मोहीम होती. नियोजित वेळेनुसार रविवारी सकाळी ११:५९ वाजता पीएसएलव्हीने उड्डाण केले. परंतु, ते पूर्णत्वास जाऊ शकले नाही. इस्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या टप्प्यात मोटारच्या कप्प्यात आवश्यक दबाव कमी झाल्याने ही मोहीम अपयशी ठरली. लवकरच या दोषाचे विश्लेषण करून नव्याने मोहीम आखली जाईल.
पृथक्करण प्रणालीतील दोषाचा परिणाम
यानाच्या प्रक्षेपणानंतर पृथक्करणाचे (विभक्त होण्याची प्रक्रिया) चार टप्पे असतात. पहिला टप्पा १११.६४ सेकंदात अपेक्षित होता, तो ११० सेकंदातच पूर्ण झाला. दुसऱ्या टप्प्यात इग्निशन १११.८४ सेकंदात अपेक्षित होते. ते ११०.२ सेकंदात पूर्ण झाले. तिसरा टप्पा महत्त्वाचा होता. यात पृथक्करण २६४.३४ सेकंदांना अपेक्षित होते. मात्र, ते २६१.८ सेकंदातच झाले आणि अपेक्षित प्रक्षेपण होऊ शकले नाही.
अयशस्वी प्रक्षेपणानंतर रॉकेटचे काय झाले?
पीएसएलव्हीच्या प्रक्षेपणानंतर सुमारे ४५० किलोमीटर उंचीवर तिसऱ्या टप्प्यात ही समस्या उद्भवली. त्यामुळे हे रॉकेट समुद्रात कोसळले असेल.\
ईओएस-०९ आहे काय?
२०२२ मध्ये ईओएस-०४ उपग्रह पीएसएलव्हीच्या साहाय्याने प्रक्षेपित करण्यात आला होता. तसाच हा एक कृत्रिम उपग्रह आहे. कोणत्याही वातावरणात पृथ्वीच्या पृष्ठभागाची अत्यंत स्पष्ट छायाचित्रे घेण्याची याची क्षमता आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन, कृषी, वन देखरेख, सुरक्षेसाठी महत्त्व आहे.