१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 06:09 IST2025-10-28T06:08:48+5:302025-10-28T06:09:23+5:30
आयोगाने सोमवारी फेरतपासणी होणार असलेल्या राज्यांची नावे जाहीर केली. त्यात महाराष्ट्राचा समावेश नाही.

१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
नवी दिल्ली : १२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष पुनरावलोकन मोहिमेचा (एसआयआर) दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने सोमवारी केली. अंदमान व निकोबार बेटे, लक्षद्वीप, छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, पुदुच्चेरी, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल येथे ही प्रक्रिया पार पडणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार म्हणाले की, तामिळनाडू, पुदुच्चेरी, केरळ व पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका २०२६मध्ये होणार आहेत. आसाममधील प्रक्रियेबद्दल स्वतंत्र घोषणा केली जाईल. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची हे नववे एसआयआर आहे. आठवे एसआयआर २००२-२००४ या कालावधीत झाले होते.
महाराष्ट्रात एसआयआर नाहीच
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारयाद्यांची विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) तूर्त महाराष्ट्रात न करण्याचा निर्णय घेतल्याने आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग प्रशस्त झाला आहे. मतदारयाद्यांची सखोल फेरतपासणी करूनच निवडणुका घ्या, अशी मागणी मविआ आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. मात्र, आयोगाने सोमवारी फेरतपासणी होणार असलेल्या राज्यांची नावे जाहीर केली. त्यात महाराष्ट्राचा समावेश नाही.
७ फेब्रुवारीला प्रकाशित अंतिम यादी
या प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात ५१ कोटी मतदारांचा समावेश असेल. ही प्रक्रिया ४ नोव्हेंबरपासून सुरू होईल. मसुदा याद्या ९ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होतील. ७ फेब्रुवारीला अंतिम यादी प्रकाशित केली जाईल.