नवी दिल्ली : मोटार वाहन कायद्यातील नव्या भरमसाठ दंडाला देशातील किमान १३ राज्यांनी विरोध दर्शवून तो अमलात न आणण्याचा निर्णय घेतला आहे, तर काही राज्यांनी स्वत:च्या अधिकारात दंडाची रक्कमच कमी करून, आपणास केंद्रीय कायद्यातील दंड मान्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.महाराष्ट्र सरकारने या कायद्यातील दंडाच्या तरतुदी आहे तशाच लागू करायच्या की दंड कमी करायचा, याबाबत अद्याप निर्णयच घेतलेला नाही. या तरतुदी लगेच लागू करण्यात येणार नसल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले आहे; पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्याबाबत वेगळे मत नोंदविले आहे. त्यामुळे दंडाच्या नव्या तरतुदी लगेच लागू करणार की विधानसभा निवडणुका झाल्यानंतर निर्णय घेणार, हे स्पष्ट झालेले नाही.भाजपशासित राज्य असलेल्या गुजरातने दंडाची रक्कम कमी केली आहे, तर भाजपचीच सत्ता असलेल्या झारखंडनेही नव्या दंडाच्या तरतुदी तीन महिने लागू न करण्याचे ठरविले आहे, असे दिसते. कर्नाटकातही भाजपची सत्ता आहे; पण तेथील मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनीही दंडाची रक्कम कमी करण्याच्या सूचना परिवहन खात्याची जबाबदारी असलेले उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांना दिल्या आहेत. हरियाणामध्ये सध्या नव्या तरतुदींप्रमाणे दंड आकारला जात असला तरी तेथील भाजप सरकारही विधानसभा पुढील तीन महिने म्हणजेच निवडणुका होईपर्यंत त्याला स्थगिती देण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
वाहन कायदा : भरमसाठ दंडाला राज्यांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 05:11 IST