'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 12:42 IST2025-12-10T12:41:23+5:302025-12-10T12:42:25+5:30
Shashi Tharoor Savarkar Award Controversy: ऑपरेशन सिंदूरवेळी भारत सरकारने पाठविलेल्या डेलिगेशनमध्ये काँग्रेसकडून शशी थरूर यांचे नाव होते. थरूर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशांदेशांत जाऊन तिथे भारताने पाकिस्तानवर हल्ला का केला, याची भूमिका मांडली होती. यामुळे थरूर यांना हा पुरस्कार देण्यात येत होता.

'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी 'एचआरडीएस इंडिया' या स्वयंसेवी संस्थेकडून देण्यात येणारा 'वीर सावरकर इंटरनॅशनल इम्पॅक्ट अवॉर्ड २०२५' स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. थरूर यांचे नाव या पुरस्कारासाठी नामित झाल्याची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही तासांत त्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.
ऑपरेशन सिंदूरवेळी भारत सरकारने पाठविलेल्या डेलिगेशनमध्ये काँग्रेसकडूनशशी थरूर यांचे नाव होते. थरूर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशांदेशांत जाऊन तिथे भारताने पाकिस्तानवर हल्ला का केला, याची भूमिका मांडली होती. यामुळे थरूर यांना हा पुरस्कार देण्यात येत होता. शशी थरूर यांनी हा पुरस्कार नाकारण्यामागे मुख्य कारण म्हणजे, त्यांच्या पूर्व सहमतीशिवाय त्यांचे नाव पुरस्कारासाठी जाहीर करणे हे आहे. थरूर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना या पुरस्काराबद्दलची माहिती माध्यमांमधून कळाली, जेव्हा ते केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कामात व्यस्त होते.
"पुरस्कारासाठी माझे नाव घोषित करण्यापूर्वी संस्थेने माझ्याशी संपर्क साधून माझी संमती घेणे आवश्यक होते. माझ्या परवानगीशिवाय जाहीर केलेल्या या पुरस्काराचा प्रस्ताव मी स्वीकारू शकत नाही," असे मत थरूर यांनी व्यक्त केले.
पुरस्कारात एकूण ६ जणांना नामांकन
एचआरडीएस इंडियाने एकूण सहा व्यक्तींना या पुरस्कारासाठी नामित केले आहे. दिल्लीमध्ये हा पुरस्कार समारंभ होणार होता. मात्र, पुरस्कार स्वीकारण्यास काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने दिलेला नकार आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. काँग्रेस पक्ष सातत्याने सावरकरांच्या विचारधारेवर टीका करत असल्याने, थरूर यांना हा पुरस्कार जाहीर होणे, आणि त्यानंतर त्यांनी तो त्वरित नाकारणे, याकडे अनेक राजकीय निरीक्षक 'विचारधारेची स्पष्ट भूमिका' म्हणून पाहत आहेत.