'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 07:08 IST2025-12-19T07:08:28+5:302025-12-19T07:08:42+5:30
२० वर्षे जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अॅड आजीविका मिशन (ग्रामीण) म्हणजेच व्हीबी-जी राम जी) हे नवे विधेयक गुरुवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले.

'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
नवी दिल्ली: २० वर्षे जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अॅड आजीविका मिशन (ग्रामीण) म्हणजेच व्हीबी-जी राम जी) हे नवे विधेयक गुरुवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले.
या विधेयकावरील चर्चेला कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान हे सभागृहात उत्तर देत असताना विरोधकांनी गदारोळ माजविला. विरोधकांनी या विधेयकाचे कागद फाडून ते सभागृहात भिरकावले. विरोधकांचे हे वर्तन म्हणजे गुंडगिरी असल्याची टीका चौहान यांनी केली. या घटनेनंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी
व्हीबी-जी राम जी विधेयकाला विरोध करण्यासाठी विरोधी पक्षांचे सदस्य लोकसभेतील हौद्यामध्ये गोळा झाले. त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या. या प्रकाराबद्दल सत्ताधारी भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान उत्तर देत असताना विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले.
'मनरेगातील त्रुटी दूर करणे आवश्यक होते'
१. मनरेगा कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी नवे विधेयक सादर करावे लागले असे शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले. व्हीबी-जी राम जी विधेयकावर लोकसभेत सुमारे आठ तास चर्चा झाली. त्याला उत्तर देताना चौहान म्हणाले की, महात्मा गांधी यांच्या विचारांची काँग्रेसने हत्या केली आहे.
२. काँग्रेसने गांधीजींच्या नावाचा वापर फक्त राजकीय फायद्यासाठी केला. जी राम जी योजनेसाठी राखून ठेवलेला निधी फक्त मजुरीसाठी वापरला जाऊ नये, तर त्यातून कायमस्वरूपी साधनसंपत्ती निर्माण व्हावी असा केंद्र सरकारचा उद्देश आहे असेही ते म्हणाले.