भारतीय रेल्वेची हायस्पीड आणि प्रीमियम ट्रेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्स्प्रेसमधील खान-पान सेवेचा दर्जा पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात सापडला आहे. पटना-टाटानगर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाला देण्यात आलेल्या अमूल दह्यात अळ्या आढळल्याची तक्रार समोर आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. याप्रकरणी IRCTCने दिग्गज दुग्धजन्य पदार्थ कंपनी 'अमूल'ला नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले होते.
१५ मार्च रोजी घडलेल्या या प्रकारानंतर रेल्वे मंत्रालयाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ केल्याबद्दल रेल्वेने आपलीच कंपनी असलेल्या IRCTCवर १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच, संबंधित ट्रेनमधील कॅटरिंग कंत्राटदाराला तब्बल ५० लाख रुपयांचा दंड सुनावण्यात आला असून, त्याचे कंत्राट रद्द करण्याची आणि त्याला ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अमूलचे स्पष्टीकरण: "अळ्या जगणे शास्त्रीयदृष्ट्या अशक्य"
या गदारोळानंतर अमूल कंपनीने जाहीर पत्रक प्रसिद्ध करून आपली बाजू मांडली आहे. अमूलने म्हटले आहे की, "आमच्या दही उत्पादन प्रक्रियेत अळ्या असणे किंवा त्यांची वाढ होणे शास्त्रीय आणि तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. दही हे आम्लयुक्त असते आणि त्यात ऑक्सिजन नसतो, अशा वातावरणात अळ्या जिवंत राहू शकत नाहीत. तसेच, दह्यासाठी आवश्यक असणारे थंड तापमान अळ्यांच्या वाढीसाठी पोषक नसते."
ट्रेमध्येच होता घोळ?
अमूलने आपल्या अंतर्गत तपासणीनंतर धक्कादायक दावा केला आहे. कंपनीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओचे विश्लेषण केले असता, त्या अळ्या दह्यातून नव्हे तर कंत्राटदाराने पुरवलेल्या 'सर्व्हिंग ट्रे'मधून आल्या असाव्यात, असा प्राथमिक अंदाज आहे. विशेष म्हणजे, ज्या बॅचचे दही त्या प्रवाशाला दिले गेले, ते अमूलच्या अधिकृत वितरण साखळीतून रेल्वेला पुरवण्यात आले नव्हते, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे वंदे भारतमधील खान-पान सेवेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, रेल्वे आता कंत्राटदारांच्या गुणवत्तेवर अधिक कडक पाळत ठेवणार असल्याचे दिसत आहे.
Web Summary : Amul refuted claims of maggots in its yogurt served on the Vande Bharat Express, suggesting the contamination originated from the serving tray. An internal investigation revealed the yogurt wasn't from their official supply chain.
Web Summary : अमूल ने वंदे भारत एक्सप्रेस में परोसे गए दही में कीड़े होने के दावों का खंडन किया, और सुझाव दिया कि संदूषण परोसने वाली ट्रे से हुआ है। एक आंतरिक जांच से पता चला कि दही उनकी आधिकारिक आपूर्ति श्रृंखला से नहीं था।