वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 12:18 IST2025-08-29T12:15:04+5:302025-08-29T12:18:13+5:30
वैष्णोदेवी मार्गावर झालेल्या भूस्खलन दुर्घटनेमुळे उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये शोककळा पसरली आहे.

फोटो - आजतक
जम्मू-काश्मीरमधील वैष्णोदेवी मार्गावर झालेल्या भूस्खलन दुर्घटनेमुळे उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत जिल्ह्यातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाले आहेत आणि काही जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक प्रशासन कुटुंबीयांच्या संपर्कात आहे.
जम्मूमधील माता वैष्णोदेवीच्या मार्गावर भूस्खलन झाल्यामुळे ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत मुझफ्फरनगर जिल्ह्यातील ६ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. जिल्ह्यातील नगर कोतवाली भागातील रामलीला टिल्ला येथील रहिवासी कार्तिक यांच्या मृत्यूची माहिती आधीच मिळाली होती. आता रामपुरी मोहल्ला येथील २३ जणांचा गटही या दुर्घटनेचा बळी ठरला आहे. या गटातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे, अनेक जण जखमी झाले आहेत आणि काही लोक बेपत्ता आहेत. मुझफ्फरनगरमध्ये एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
माजी केंद्रीय राज्यमंत्री संजीव बालियान यांनी गुरुवारी पीडित कुटुंबांची भेट घेतली. त्यांनी सांगितलं की, कालपर्यंत फक्त कार्तिकच्या मृत्यूची बातमी आली होती, परंतु आता असं समोर आलं आहे की, रामपुरी मोहल्ला येथील आणखी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या गटात असलेले रामवीरी आणि त्यांची मुलगी अंजली यांचाही मृत्यू झाला आहे.
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
रामपुरी मोहल्ला येथील रहिवासी संदीप कुमार यांनी सांगितलं की, त्यांची मेहुणी रामवीरी (४८) आणि भाची अंजल यांचा मृत्यू झाला आहे. वैष्णोदेवी यात्रेला गेल्याच्या तीन दिवसांनी हा अपघात झाला. कटरा येथे पोहोचल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी शेवटचे फोनवर बोलले होते. त्यांनी प्रशासनाला मदतीची विनंती केली. कुटुंबातील सदस्य मृत असोत, जखमी असोत किंवा सुरक्षित असोत त्यांना परत आणावं. काही जण अजूनही बेपत्ता आहेत.