राज्यसभेच्या खासदार पी.टी उषा यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर; अचानक झालं पतीचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 10:31 IST2026-01-30T10:30:27+5:302026-01-30T10:31:09+5:30
नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर पी.टी उषा यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली होती

राज्यसभेच्या खासदार पी.टी उषा यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर; अचानक झालं पतीचं निधन
तिरुवनंतपुरम - भारतीय ऑलंपिक संघाच्या अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार पी.टी उषा यांचे पती वी श्रीनिवासन यांचं शुक्रवारी निधन झालं. श्रीनिवासन हे त्यांच्या पेरुमलपुरम येथील घरी रात्री १ च्या सुमारास पडले होते. त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही घटना अशा वेळी झाली जेव्हा पी.टी उषा मतदारसंघातून परतत होत्या, त्या घरी नव्हत्या.
पी.टी.उषा यांचे पती श्रीनिवासन हे ६७ वर्षांचे होते. वी. श्रीनिवासन यांचा जन्म कुट्टिक्काड पोन्नानीच्या वेंगाली थारवाद येथे नारायणन आणि सरोजिनी यांच्या घरी झाला. ते सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स(CISF) मध्ये उपअधीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. १९९१ साली पी.टी उषा यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले. हे दोघेही एकमेकांच्या नातेसंबंधात होते. पतीच्या अचानक निधनाने पी.टी उषा यांना मोठा धक्का बसला आहे.
Deeply saddened to learn about the passing away of Shri V. Srinivasan ji, husband of Rajya Sabha MP & President of the Indian Olympic Association, @PTUshaOfficial ji.
— Kiren Rijiju (@KirenRijiju) January 30, 2026
My heartfelt condolences to Usha ji & the bereaved family. Prayers for strength in this difficult time.
ॐ… pic.twitter.com/JW5O8362Gg
श्रीनिवासन हे शुक्रवारी त्यांच्या राहत्या घरी चक्कर येऊन खाली कोसळले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र त्यांना वाचवण्यात यश आले नाही. केंद्र सरकारचे माजी कर्मचारी श्रीनिवासन हे पी.टी उषा खेळ आणि राजकीय कारकिर्दीत कायम त्यांच्यासोबत उभे राहिले. पी.टी उषा यांच्या यशामागे पती श्रीनिवासन यांची प्रेरणा होती. या जोडप्याला उज्ज्वल नावाचा एक मुलगाही आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी श्रीनिवासन यांच्या मृत्यूनंतर पोस्ट करत पी.टी उषा यांचे सांत्वन केले आहे.
अजित पवारांच्या निधनावर व्यक्त केला होता शोक
नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर पी.टी उषा यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. अजित पवार हे महाराष्ट्र ऑलंपिक संघटनेचे अध्यक्ष होते. त्यांच्या जाण्याने क्रीडा विश्वातही शोक व्यक्त केला जात आहे. याबाबत पी.टी उषा यांनी त्यांच्या पोस्टवर अजित पवारांचा रायफल शुटींग करतानाचा फोटो टाकत त्यांच्या कुटुंबाविषयी संवेदना मांडल्या होत्या.