बोगद्यात अडकलेल्या कामगारांबाबत मोठी अपडेट, ४० नाही तर एवढे कामगार आहेत अडकून
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 14:52 IST2023-11-18T14:52:26+5:302023-11-18T14:52:53+5:30
Uttarkashi Tunnel Accident : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे बांधकाम सुरू असलेल्या सिलक्यारा बोगद्यामध्ये दरड कोसळून आत अडकून पडलेल्या कामगारांबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

बोगद्यात अडकलेल्या कामगारांबाबत मोठी अपडेट, ४० नाही तर एवढे कामगार आहेत अडकून
उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे बांधकाम सुरू असलेल्या सिलक्यारा बोगद्यामध्ये दरड कोसळून आत अडकून पडलेल्या कामगारांबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आतापर्यंत बोगद्यामध्ये ४० कामगार अडकल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता बोगद्यामध्ये ४० नाही तर ४१ कामगार अडकून असल्याची माहिती समोर आली आहे.
उत्तर काशी जिल्हा आपातकालिन परिचालन केंद्राकडून बोगद्यात अडकलेल्या ४१ श्रमिकांच्या सुधारित यादीमधून ही माहिती समोर आली आहे. या कामगारांना बाहेर काढण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र या मोहिमेच्या सहाव्या दिवशी यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर बांधण्यास येत असलेल्या या बोगद्यामध्ये अडकलेल्या कामगारांमध्ये बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील रहिवासी दीपक कुमार पटेल याचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बोगद्यात अडकून पडलेल्या बिहारमधील कामगारांची संख्या ही पाच झाली आहे.
सिलक्यारा बोगद्यात कोसळलेल्या दगडमातीच्या ढिगाऱ्याला भेदून कामगारांपर्यंत पोहोचण्याच्या मार्गामध्ये वारंवार अडथळे येत आहेत. त्यामुळे बोगद्यात अडकून पडलेल्या कामगारांची सहाव्या दिवशीही सुटका होऊ शकलेली नाही. दरम्यान, उत्तरकाशी आपत्ती नियंत्रण कक्षाकडून शनिवारी सकाली मिळालेल्या माहितीनुसार सध्या बोगद्यामध्ये ड्रिलिंगचं काम थांबलेलं आहे.