"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 16:56 IST2025-08-05T16:54:27+5:302025-08-05T16:56:03+5:30

उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये ढगफुटीने मोठ्या प्रमाणात विनाश केला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

uttarkashi cloud burst eyewitness says lodges hotels villages and houses all destroye he had never seen such scene | "ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव

फोटो - आजतक

उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये ढगफुटीने मोठ्या प्रमाणात विनाश केला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५० जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. अनेक घरं उद्ध्वस्त झाली. एका स्थानिक रहिवाशाने दिलेल्या माहितीनुसार, "आज दुपारी १.३० वाजता पूर आला, ज्यामुळे धरालीमध्ये मोठं नुकसान झालं आहे. ६० ते ७० लोक बेपत्ता आहेत. त्यांच्याशी संपर्क झालेला नाही."

"१९७८ मध्ये ५ ऑगस्ट रोजी कांजोडिया नावाच्या ठिकाणी पूर आला होता. आज धरालीमध्ये विनाश झाला आहे. ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा आणि गाव सर्वकाही उद्ध्वस्त झालं आहे, आम्ही आमच्या मुखवा गावातून हे भयानक दृश्य पाहत आहोत. हे असं दृश्य कधीच पाहिलं नाही." आजतकशी बोलताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

दुसऱ्या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, काल रात्रीपासून धरालीमध्ये सतत पाऊस पडत आहे, खीरगंगा नदीत ढगफुटीमुळे खूप विनाश झाला आहे. यामुळे केदारनाथ दुर्घटनेची आठवण झाली. १०० हून अधिक लोक गाडले गेले आहेत. प्रशासन पूर्णपणे तयार आहे आणि सैन्य देखील पोहोचणार आहे. बचावकार्य वेगाने सुरू आहे. ढगफुटीमुळे संपूर्ण गाव उद्ध्वस्त झालं आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तराखंडच्या धराली भागात ढगफुटीच्या दुर्दैवी घटनेची फोनवरून माहिती घेतली आहे. याच दरम्यान, त्यांना राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या मदत आणि बचावकार्याची माहिती देण्यात आली. त्यांनी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

ढगफुटीच्या या घटनेनंतर, गंगोत्री धामचा जिल्हा मुख्यालयाशी पूर्णपणे संपर्क तुटला आहे. धरालीमध्ये पाण्याची पातळी वाढल्याने बाजारपेठ आणि घरांचे बरेच नुकसान झाले आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशसारख्या डोंगराळ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि ढगफुटीच्या घटना वारंवार घडत आहेत. या दुर्घटनांमध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Web Title: uttarkashi cloud burst eyewitness says lodges hotels villages and houses all destroye he had never seen such scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.