सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 10:53 IST2025-10-30T10:52:27+5:302025-10-30T10:53:26+5:30
Uttarakhand Panchayat Gold Fine: कंदाड आणि इद्रोली या दोन गावांच्या ग्रामपंचायतीने सामाजिक सुधारणेच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वाचा आणि अनोखा निर्णय घेतला आहे.

सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
सोन्याच्या वाढलेल्या दरांवरून आता सोने केवळ करोडपतींच्याच आवाक्यात आले आहे. सामान्य, मध्यम वर्गाच्या खिशाला न परवडणारी किंमत झाल्याने खासकरून महिला वर्गाचा हिरमोड झाला आहे. याचा सर्वाधिक फटका येत्या लग्नसराईत बसणार आहे. आधीच दागिने करून ठेवलेले असले तर ठीक नाहीतर अनेकांना काही ग्रॅमचेच दागिने करावे लागणार आहेत. अशातच उत्तराखंडमधील जौनसार-बावर या आदिवासी क्षेत्रातील एका ग्राम पंचायतीने नवा आदेश पारीत केला आहे.
कंदाड आणि इद्रोली या दोन गावांच्या ग्रामपंचायतीने सामाजिक सुधारणेच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वाचा आणि अनोखा निर्णय घेतला आहे. लग्नसमारंभ आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये महिलांना सोन्याचे दागिने घालण्यावर सक्त मर्यादा घालण्यात आली आहे. आता महिलांना केवळ तीनच सोन्याचे दागिने परिधान करण्याची परवानगी असणार आहे. यामध्ये कानातील कर्णफुले, नाकातील नथ आणइ मंगळसूत्र एवढेच दागिने महिला घालू शकणार आहेत.
याव्यतिरिक्त कोणताही अतिरिक्त किंवा जादा सोन्याचा दागिना घातल्यास, संबंधित महिलेला ₹५०,००० इतका मोठा दंड भरावा लागणार आहे. तसेच या निर्णयाला विरोध करणाऱ्यासही तितकाच दंड भरावा लागणार आहे.
हा नियम का लागू करण्यात आला?
गावातील नागरिकांचे असे मत आहे की, गेल्या काही वर्षांपासून लग्नसमारंभात सोन्याच्या दागिन्यांचे प्रदर्शन करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर अनावश्यक आर्थिक बोजा पडतो आणि समाजात आर्थिक विषमतेची भावना वाढते. श्रीमंत लोकांच्या तोडीस तोड दागिने दाखवण्याच्या सामाजिक दबावामुळे अनेक कुटुंबे कर्जाच्या खाईत लोटली जात आहेत. सध्या सोन्याचे दर सव्वा लाखावर गेले आहेत. महिला घरात वेगवेगळ्या सोन्याच्या दागिन्यांची मागणी करतात, त्यामुळे दबाव वाढून अनावश्यक खर्च वाढत आहे, असे या पंचायतीचे म्हणणे आहे. ग्रामस्थांनी सर्वानुमते घेतलेला हा निर्णय सामाजिक सुधारणा चळवळीचा एक भाग म्हणून पाहिला जात आहे, जेणेकरून सर्वजण आत्मसन्मानाने समारंभात सहभागी होऊ शकतील.