Chamoli Cloudburst: उत्तराखंडमधील चमोली येथे मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास ढगफुटी झाल्याची घटना घडली आहे. चमोलीतील थराली येथे ही ढगफुटी झाली. या घटनेत २ जण गाडले गेल्याचे वृत्त आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी एसडीआरएफचा चमू घटनास्थळी रवाना झाला आहे. उत्तराखंडचेमुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या घटनेसंदर्भात दुःख व्यक्त केले आहे.
यासंदर्भात बोलताना चमोलीचे जिल्हाधिकारी (डीएम) संदीप तिवारी म्हणाले, काल रात्री थराली तालुक्यात ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले असल्याची शक्यता आहे. या ढगफुटीमुळे बरेच ढिगारे आले असून, यामुळे एसडीएम निवासस्थानासह अनेक घरांचे पूर्णपणे नुकसान झाले आहेत. अगदी एसडीएम निवासस्थान देखील चार फूट ढिगार्याने भरले आहे.
एडीएम विवेक प्रकाश म्हणाले, थराली येथे ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. २० वर्षांची एक मुलगी आणि एक वृद्ध बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. दोघेही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती आहे. त्यांचा शोध सुरू आहे. थराली आणि आसपासच्या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे ढिगारा आला आहे.
प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य -चामोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री थरली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, थराली पोलिसांनी रात्रीच तत्परता दाखवत स्थानिक लोकांना सतर्क केले आणि त्यांना त्यांच्या घरातून सुरक्षित ठिकाणी हलवले.
सीएम धामी यांचे तत्काल मदतीचे निर्देश -दरम्यान उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या घटनेप्रति दुःख व्यक्त केले आहे. 'एक्स'वर पोस्ट करत ते ते म्हणाले, "चमोली जिल्ह्यातील थरली भागात रात्री उशिरा ढगफुटीची दुःखद बातमी मिळाली. जिल्हा प्रशासन, एसडीआरएफ, पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत आणि मदत तथा बचाव कार्याला लागले आहेत. मी या संदर्भात स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे आणि परिस्थितीवर वैयक्तिकरित्या लक्ष ठेवून आहे. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी देवाकडे प्रार्थना करतो.'