Uttar Pradesh: 'योगी जी तुम्ही संत आहात, सपाच्या चुका माफ करा आणि आझम खानची सुटका करा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 10:02 IST2022-04-28T10:01:29+5:302022-04-28T10:02:01+5:30
Uttar Pradesh: मौलाना शहाबुद्दीन रिझवी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून आझम खान यांची तुरुंगातून सुटका करण्याची मागणी केली आहे.

Uttar Pradesh: 'योगी जी तुम्ही संत आहात, सपाच्या चुका माफ करा आणि आझम खानची सुटका करा'
लखनौ: ऑल इंडिया तंझीम उलेमा-ए-इस्लामचे राष्ट्रीय सरचिटणीस मौलाना शहाबुद्दीन रिझवी(Maulana Shahabuddin Rizvi) यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे तुरुंगात कैद असलेल्या आझम खानच्या(Azam khan) सुटकेचे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी दोन पत्रे लिहिली आहेत. पहिले पत्र योगी आदित्यनाथ यांना लिहिले आहे, तर दुसरे पत्र सपाचे संरक्षक मुलायम सिंह यादव यांना लिहिले आहे.
मुख्यमंत्री योगी यांना लिहिलेले पत्र
मौलाना शहाबुद्दीन राजवी यांनी मुख्यमंत्री योगींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'आझम खान अडीच वर्षांपासून तुरुंगात आहेत. ते उत्तर प्रदेशमध्ये अनेक वेळा आमदार-खासदार आणि मंत्रीही राहिले आहेत. तुरुंगात त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था नाही. त्यामुळे आझम खानची सुटका करावी. यामुळे मुस्लिमांचा तुमच्याबद्दलचा विचारही बदलेल.'
'तुम्ही संत आहात'
याशिवाय मौलाना यांनी लिहिले की, 'तुम्ही यूपीचे प्रमुख तसेच धार्मिक व्यक्ती आणि संत आहात, आम्हाला आशा आहे की समाजवादी पक्षाच्या सरकारमधील चुकीच्या निर्णयाचा आणि कायद्याच्या उल्लंघनाचा सहानुभूतीपूर्वक विचार केल्यानंतर तुम्ही आझम यांच्या सुटकेचा विचार कराल. हे काम तुम्ही केले तर उत्तर प्रदेशातीलच नव्हे, तर संपूर्ण देशातील मुस्लिमांच्या मनात तुमच्याबद्दलचा विचार बदलेल.'
मुलायमसिंह यादव यांनाही पत्र लिहिले
मौलाना शहाबुद्दीन रिझवी यांनी मुलायम सिंह यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'मोहम्मद आझम खान हे तुमच्या जुन्या साथीदारांपैकी एक आहेत. संघर्षाच्या दिवसात त्यांनी नेहमीच तुमच्या खांद्याला खांदा लावून साथ दिली आहे. अखिलेश यादव यांच्यासाठी कन्नौजमध्ये पहिल्यांदा आझम खान यांनी मत मागितले होते. मुस्लिमांनीही त्यांना निवडून आणले. पण, आता जेव्हा त्याच्यावर वाईट वेळ आली आहे, ते एकटे आणि एकाकी उभे आहेत. तुमच्या पक्षाकडून आणि तुमच्या बाजूने कोणतीही मदत झालेली नाही.'