एका चोरीच्या गुन्ह्यामध्ये महिला पोलिसाचा पतीच सोनसाखळी चोर निघाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील लखनौ येथून उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून चोरी केलेली सोनसाखळी, एक लॉकेट, मोबाईल फोन आणि गुन्ह्यावेळी वापरलेली बुलेट जप्त केली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार आरोपी शुभम राजपूत हा अयोध्या येथे तैनात असलेल्या त्याच्या पत्नीला सोन्याची चेन भेट देऊ इच्छित होता. मात्र त्याच्याकडे चेन देण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे त्याने चोरी करण्याची योजना आखली. त्यानुसार २२ मे रोजी दुपारी सरोजिनीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रिमूर्तीनगर कॉलनीतील रहिवासी असलेली महिला कृष्णादेवी ही लोकबंधू रुग्णालय रोडवरून तिच्या दिराच्या घरी जात होती. त्याचवेळी बुलेटवरून आलेल्या शुभम याने तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केला होता.
या प्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेत तपासासाठी दोन पथके तैनात केली होती. तपासादरम्यान, पोलिसांनी ५०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी केली. तसेच आणि तांत्रिक आणि इतर पुराव्यांच्या आधारावर २६ मे रोजी आरोपी शुभम याला अटक केली.पोलिसांनी केलेल्या चौकशीवेळी शुभम याने सांगितले की, तो आधी परिसराची रेकी करायचा. मग एकट्या महिलेला हेरून चोरी करायचा.
दरम्यान, पत्नीची चेन काही दिवसांपूर्वी हरवल्याने या गुन्ह्यात चोरी केलेली चेन तो पत्नीला देणार होता. दरम्यान, शुभम याने २०१६ ते २०१९ दरम्यान, एका सोन्याच्या दुकानात सेल्समन म्हणून काम केलं होतं. त्यानंतर त्याने स्वत:चं दुकान सुरू केलं होतं. मात्र तोटा झाल्याने त्याला हे दुकान बंद करावं लागलं होतं. आता पोलिसांनी शुभम याला अटक करून त्याची तुरुंगात रवानगी केली आहे.