योगींच्या राज्यात पाकिस्तानी महिला बनली सरपंच!; प्रकरण उघड होताच उडाली खळबळ, अन्...

By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 31, 2020 05:27 PM2020-12-31T17:27:46+5:302020-12-31T17:37:54+5:30

येथील एका गावात चक्क पाकिस्तानी महिला सरपंच बनली. विशेष म्हणजे, ही महिला संरपंच होईपर्यंत गावातील कुणालाही, ती महिला पाकिस्तानी असल्याची साधी भनकही लागली नव्हती.

Uttar Pradesh Pakistani woman became Sarpanch in etah | योगींच्या राज्यात पाकिस्तानी महिला बनली सरपंच!; प्रकरण उघड होताच उडाली खळबळ, अन्...

(फाईल फोटो.)

Next
ठळक मुद्देउत्तर प्रदेशातील एका गावात चक्क पाकिस्तानी महिला सरपंच बनली. ही महिला संरपंच होईपर्यंत गावातील कुणालाही, ती पाकिस्तानी असल्याची साधी भनकही लागली नव्हती.या महिलेने सरपंच होण्यासाठी बनावट आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्रही तयार केले होते.

लखनौ -उत्तर प्रदेशमधील एटा जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एका गावात चक्क पाकिस्तानी महिला सरपंच बनली. विशेष म्हणजे, ही महिला संरपंच होईपर्यंत गावातील कुणालाही, ती पाकिस्तानी असल्याची साधी भनकही लागली नव्हती. एवढेच नाही, तर या महिलेने सरपंच होण्यासाठी बनावट आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्रही तयार केले होते. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना मोठा धक्का बसला आहे. या महिलेला निवडणूक लढण्यासाठी बनावट कागदपत्रे, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र कुठून मिळालं? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानात राहणारी 64 वर्षीय बानो बेगम ही 35 वर्षांपूर्वी एटा जिल्ह्यातील एका गावात तिच्या नातलगांकडे आली होती. यानंतर तिने तेथीला अख्तर अली या युवकाशी लग्न केले. तेव्हापासून ती भारतीय व्हिसा मिळवून भारतात राहते. मात्र, तिला अद्याप भारताचे नागरिकत्व मिळालेले नाही.

पंचायत समितीच्या निवडणुकीत विजय -
बानो बेगम हीने 2015 मध्ये झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीही अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत बानो बेगमचा विजय झाला होता. यानंतर पाच वर्षांनी जानेवारी महिन्यात गावच्या सरपंच शहनाज बेगम यांचे निधन झाले. यानंतर, बानो बेगम काही राजकीय समीकरणे जोडून गाव समितीच्या शिफारशीने गावची सरपंच झाली. यासंदर्भात बोलताना पोलिसांनी सांगितले की, बानो सातत्याने तिच्या व्हिसाचा कालावधी वाढवत येथेच राहत आहे. आणि येथे राहतच ती गावची संरपंच झाली.

जिल्हा पंचायत राज अधिकारी आलोक प्रियदर्शी म्हणाले, "बानो बेगमविरोधात मिळालेल्या तक्रारीच्या आधारे ती पाकिस्तानची नागरिक असल्याचे आढळून आले आहे. तिने बनावट पद्धतींद्वारे भारताचे मतदार ओळखपत्र आणि आधार कार्डदेखील तयार केले असल्याचे उघड झाले आहे.

असा झाला भांडाफोड -
गावातील स्थानिक नागरिक कुवैदन खान यांना या महिलेचा संशय आला. यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांत तक्रार दाखल होताच या महिलेने सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हा पंचायत राज अधिकारी (DPRO) आलोक प्रियदर्शी यांनी एटा जिल्हा दंडाधिकारी सुखलाल भारती यांच्यासमोर हे प्रकरण सादर केले आहे. त्यांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश दिले आहेत.

जिल्हा दंडाधिकारी भारती म्हणाले, “ग्रामपंचायतीची निवडणूक लढवण्यासाठी संबंधित महिलेने आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे कशी मिळविली याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामागे जो कोणी असेल, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल." याशिवाय, बानो यांना सरपंच म्हणून नियुक्त करण्याची शिफारस करणारे ग्राम सचिव ध्यानपाल सिंह यांचीदेखील त्यांच्या पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.

Web Title: Uttar Pradesh Pakistani woman became Sarpanch in etah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.