Uttar Pradesh Election 2022: साहेब, मी जिवंत आहे! १८ वर्ष न्यायासाठी संघर्ष; मृत व्यक्ती उत्तर प्रदेश निवडणुकीत उभं राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 15:49 IST2022-02-03T15:48:59+5:302022-02-03T15:49:47+5:30
अथक प्रयत्नानंतरही जेव्हा संतोषला न्याय मिळाला नाही तेव्हा त्याने उत्तर प्रदेश निवडणुकीत उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Uttar Pradesh Election 2022: साहेब, मी जिवंत आहे! १८ वर्ष न्यायासाठी संघर्ष; मृत व्यक्ती उत्तर प्रदेश निवडणुकीत उभं राहणार
बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठीचा सिनेमा ‘कागज’साऱखी कहानी रिअल लाइफमध्ये घडल्याचं अनुभवायला मिळत आहे. वाराणसी इथं गेली १८ वर्ष एक व्यक्ती स्वत: जिवंत असल्याचा पुरावा देत आहे. परंतु महसूल विभाग आजही या व्यक्तीला मृत मानत आहे. बनारसच्या छितौनीमधील हा प्रकार ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. साहेब, मी जिवंत आहे अशा शब्दात हा व्यक्ती प्रशासनासमोर पुरावा दाखवूनही हतबल झाला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, बनारसच्या छितौनी जिल्ह्यात राहणाऱ्या संतोष मूरत सिंह यांचा महसूल विभागाच्या नोंदीनुसार २००३ च्या मुंबई ट्रेन बॉम्बस्फोटात मृत्यू झालेला आहे. परंतु संतोषचा दावा आहे की, नातेवाईकांनी बनावट कागदपत्रे दाखवत मृत्यू प्रमाणपत्र काढलं. आणि त्याआधारे १२ एकर जमीन स्वत:च्या नावावर करत आणि ती तिसऱ्याच व्यक्तीला विकून टाकली. त्यामुळे संतोष सिंह न्यायासाठी प्रशासनाकडं विनवणी करत आहे.
अथक प्रयत्नानंतरही जेव्हा संतोषला न्याय मिळाला नाही तेव्हा त्याने उत्तर प्रदेश निवडणुकीत उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत:ला जिवंत सिद्ध करण्यासाठी गेल्या १७ वर्षापासून तो कुठल्या ना कुठल्या मार्गाने निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आतापर्यंत त्याला यश मिळालं नाही. संतोष मूरत सिंह म्हणाला की, २०१२ राष्ट्रपती निवडणूक, २०१४, २०१९ मध्ये वाराणसी लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. या निवडणुकीत त्याचा अर्ज बाद झाला. परंतु आजही तो जिवंत असल्याचं सिद्ध झालं नाही. २०१७ मध्ये त्याने शिवपूर विधानसभा जागेवरुन निवडणूक लढवली परंतु त्याठिकाणी पराभव झाला.पुन्हा एकदा संतोष स्वत:ला जिवंत सिद्ध करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची जन्मभूमी कानपूरमधून निवडणूक लढण्यासाठी अर्ज दाखल केला. पण तो रद्द करण्यात आला.
मुंबईला येत सुरु केले होते काम, परंतु...
बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर यांचा सिनेमा २००० मध्ये छितौनी इथं आला होता. त्यानंतर संतोष त्यांच्यासोबतच मुंबईला गेले आणि तिथे आचारी बनले. २००३ मध्ये मुंबईत ट्रेन ब्लास्ट झाला तेव्हा त्याच्या नातेवाईकांनी संतोषविरोधात षडयंत्र रचत स्फोटात संतोष मारला गेला असं बनाव रचून मृत्यू प्रमाणपत्र मिळवलं आणि त्याची जमीन विकून टाकली. २००४ मध्ये संतोषला हे कळालं तेव्हापासून तो न्यायाची वाट पाहत आहे. परंतु अद्याप काहीच हाती लागलं नाही.